क्रीडा क्षेत्राला निधी देऊन आंतरराष्ट्रीय क्रीडापटू घडविणार

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही

* क्रीडा संकुलात कुस्ती मॅट व क्रीडा साहित्य वितरण

अमरावती /10 ऑगस्ट : बदलत्या काळानुसार मातीवरील कुस्ती आता मॅटवर खेळायला सुरुवात झाली आहे. मातीवरील कुस्तीला महत्त्व असले, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर मॅटवरील कुस्तीला महत्त्व आहे. त्यामुळे येत्या काळात आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविण्यासाठी क्रीडा  क्षेत्राला पुरेपूर निधी घेऊन सक्षम करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. विभागीय क्रीडा संकुलात आज कुस्ती मॅट आणि इतर क्रीडा साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार संजय खोडके, सुलभा खोडके, रवी राणा, राजेश वानखेडे, विभागीय आयुक्त ेशेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, अमरावतीला पुण्याशी जोडण्यासाठी वंदे भारत रेल्वे सुरू करण्यात आली आहे. हा विकसित भारताला संकल्प राहणार आहे. येत्या काळात विमानानेही पुण्याला जोडण्याचा प्रयत्न राहणार आहे. आज शेकडो खेळाडू पुण्याशी जोडलेले आहेत. त्यामुळे या दोन्ही शहरांमध्ये जलद वाहतूक सुविधेची आवश्यकता आहे. आज भारतात प्रत्येक क्षेत्रात इतिहास घडत आहे आणि क्रीडा क्षेत्र मागे राहिलेले नाही. त्यामुळे दर्जेदार क्रीडा सुविधा देऊन अमरावती क्रीडा क्षेत्रात पुढे आहे. १९ वर्षीय दिव्या देशमुखने जागतिक बुद्धिबळात इतिहास रचला आहे. ती भारताची ८८ वी ग्रँडमास्टर बनली आहे. अमरावतीमध्ये असा इतिहास घडवण्याची गरज आहे. महाराष्ट्र केसरीमुळे कुस्तीला महत्त्व प्राप्त झाले आहे आणि या खेळाचा ऑलिंपिक स्पर्धांमध्येही समावेश झाला आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर कुस्तीगीर तयार होत आहेत. प्रादेशिक क्रीडा संकुलाच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच, येणाऱ्या काळात व्यायामशाळेसाठी १५ लाख रुपये, व्यायामशाळेच्या बांधकामासाठी १५ लाख रुपये आणि खेळाच्या मैदानाच्या दुरुस्तीसाठी २५ लाख रुपये देण्यात येतील. तसेच, इको-टुरिझममधून एका ठिकाणच्या कामासाठी ३० कोटी रुपये देण्यात येतील. त्यामुळे विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा येथे कोलकासह चार प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. यावेळी ज्येष्ठ खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. खेळाडूंना क्रीडा साहित्याचे वाटपही करण्यात आले. कुस्ती परिषदेने खेळाडूंना चांदीची गदा देऊन त्यांचा सत्कार केला. जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी प्रास्ताविक केले. उपस्थित मान्यवरांना ९४ लाख रुपयांचे क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले.

संबंधित बातम्या

Back to top button