आता शेतकर्‍यांसाठी मुंबई बंद ठेवा

यवतमाळच्या सभेचे दिले निमंत्रण

*राज ठाकरे यांच्याकडे बच्चु कडूंची मागणी
*मुंबईत शिवतीर्थावर राज ठाकरेंची घेतली भेट
*शेतकरी कर्जमाफी सह विविध मुद्यांवर चर्चा

मुंबई /6 ऑगस्ट : गेल्या काही महिन्यांपासून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकर्‍यांसाठी लढा उभा केला आहे. शेतकर्‍यांच्या विविध मागण्या मान्य व्हाव्यात, यासाठी बच्चू कडू आणि शेतकरी आंदोलन करत आहेत. निवडणुकीपूर्वी महायुतीने शेतकर्‍यांचा सात बारा कोरा करू असं ओशासन दिले होते परंतु सत्तेत येऊन 10 महिने उलटले तरीही सरकारने अद्याप शेतकरी कर्जमाफी केली नाही. त्यामुळे आता आक्रमक झालेल्या कडू त्यांचा हा लढा आणखी तीव्र करण्याच्या तयारीत आहेत. परंतु, त्याआधी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतली आहे. बच्चू कडू यांनी बुधवारी (ता. 6 ऑगस्ट) सकाळी शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, यवतमाळमध्ये जी यात्रा काढली जाणार आहे, त्याचे आमंत्रण राज ठाकरेंना दिले. तिथे त्यांनी यावे आणि शेतकर्‍यांना संबोधित करावे. तसेच आम्ही अनेकदा मुंबई बंद होताना पाहिली आता ती एक दिवस शेतकर्‍यांसाठी बंद राहायला हवी. किमान काही तास मुंबईने शेतकर्‍यांच्या मागे उभे राहावे. कारण ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि या देशाच्या राजधानीतूनच शेतकर्‍यांना दिलासा देणारा आवाज निर्माण व्हावा या अपेक्षा राज ठाकरेंकडून आहे, असे म्हणत बच्चू कडूंनी शेतकर्‍यांसाठी मुंबई बंद ठेवण्याची मागणी केली आहे.तसेच, शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी होणार्‍या आगामी आंदोलनाची दिशा, धोरणे आणि मागण्या यावर राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विचारमंथन करण्यात आले. शेतकरी हा विषय एका पक्षाचा नाही, एका जातीधर्माचा नाही. शेतकरी सर्व जातीधर्माचा आहे. त्यामुळे मनसे यात पुढे आली तर निश्चितच शेतकरी आंदोलनाला बळ मिळेल. आमचा अजेंडा निवडणुकीचा नाही. मरणारा शेतकरी वाचवायचा आहे. तर, देवेंद्र फडणवीस म्हणतात की, दुष्काळ पडला तर मग आपण कर्जमाफीचा विचार करू. त्यामुळे आता दुष्काळ पडायची वाटच पाहिली जात आहे का, असा प्रश्न आता पडला आहे. हा संपूर्ण प्रकार शेतकर्‍यांसाठी दुर्दैवी आहे. कारण गेल्या काही वर्षांपासून शेतमालाला भाव दिला जात नाही, हे त्यापेक्षा जास्त नुकसानकारक आहे. मागील दोन वर्षांपासून भाव दिला जात नाही, त्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. हे फडणवीसांच्या लक्षात आले पाहिजे, असेही यावेळी बच्चू कडू यांनी प्रसार माध्यमांसमोर म्हटले

 

 

संबंधित बातम्या

Back to top button