लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी
विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांचे प्रतिपादन

-महसूल सप्ताहाचा उत्साहात शुभारंभ
उत्कृष्ट कार्य करणार्या कर्मचार्यांचा गौरव
अमरावती / 1 ऑगस्ट : महसूल विभाग हा शासनाचा कणा असून, समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत सेवा पोहोचवण्यासाठी प्रत्येक कर्मचार्याने आपली भूमिका जाणीवपूर्वक, प्रामाणिकपणे पार पाडावी. योजनांची प्रभावी अंमलबजावणी हीच खरी लोकसेवा आहे, असे प्रेरणादायी विचार विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी व्यक्त केले. 1 ते 7 ऑगस्ट 2025 या कालावधीत साजर्या होणार्या महसूल सप्ताहाचे उद्घाटन आज अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयात उत्साहात पार पडले. या प्रसंगी महसूल विभागात उत्कृष्ट कार्य करणार्या अधिकारी व कर्मचार्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
अपर आयुक्त अजय लहाने, रामदास सिद्धभट्टी, सुरज वाघमारे, यवतमाळचे अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, नगरविकास सहआयुक्त नितीन कापडनीस आदी मंचावर उपस्थित होते. महसूल सप्ताहाच्या निमित्ताने जनतेशी थेट संवाद साधण्याची संधी मिळावी, यासाठी जिल्हा व मंडळस्तरावर विविध उपक्रम राबवले जात आहेत. ई-गव्हर्नन्स, ई-ऑफिस आणि नवीन तंत्रज्ञान यांचा वापर करून नागरिकांना वेळेत सेवा देण्यावर श्वेता सिंघल यांनी भर दिला. प्रत्येक कर्मचार्याने आत्मपरीक्षण करून पुढील वर्षी मीही पुरस्कार प्राप्त करीन, असा निर्धार करावा, असेही त्या म्हणाल्या.
या अभियानात अनेक उपक्रम राबविले जात आहेत. त्यात 2011 पूर्वी शासकीय जमिनीवर राहणार्या कुटुंबांना पट्टा वाटप, शिवार रस्त्यांची मोजणी व वृक्षलागवड, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान, लाभार्थ्यांच्या घरी भेट देऊन ऊइढ प्रक्रिया पूर्ण करणे, शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटवणे, शासनाच्या एम-सँड धोरणाची अंमलबजावणी आदींचा समावेश आहे. या प्रसंगी सुरज वाघमारे यांनी शेरशाह सूरीपासून शिवकालीन महसूल व्यवस्थेचा इतिहास उलगडून दाखवला, तर रामदास सिद्धभट्टी यांनी महसूल व्यवस्थेतील माहिती संकलन व त्याचे धोरणात्मक महत्त्व यावर भाष्य केले.
अनिल खंडागळे यांनी सेवा हमी कायदा, आपले सरकार पोर्टल यांची माहिती देत तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग कसा करावा, याचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमात भक्तीगीत गायन व सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. सूत्रसंचालन वैशाली दुधे यांनी केले. अमरावती विभागातील विविध जिल्ह्यांतून निवड झालेल्या 30 पेक्षा अधिक अधिकारी-कर्मचार्यांना गौरविण्यात आले. यामध्ये अपर जिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, महसूल सहाय्यक, शिपाई, वाहन चालक आदींचा समावेश होता.




