धामणगावात दीड लाखाचे प्रतिबंधित बियाणे जप्त

पोलिस व कृषी खात्याची संयुक्त कारवाई

धामणगाव रेल्वे/ 22 मे : धामणगाव रेल्वे येथे रामगाव रस्त्यावरील एका शेतात प्रतिबंधित कापूस बियाण्यांची 145 पाकिटे कृषी विभागाच्या पथकाने जप्त केली आहेत. गोपनीय माहितीच्या आधारे कृषी खात्याच्या अधिकार्‍यांनी पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. जप्त करण्यात आलेल्या या बोगस बियाण्यांची किंमत 1 लाख 57 हजार रुपये एवढी आहे. धामणगाव तालुक्यात खरिप हंगामाच्या तोंडावर बोगस बियाण्यांच्या विक्रीची आणखी प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हा गैरप्रकार रोखण्याचे आव्हान कृषी विभागासमोर निर्माण झाले आहे.
तालुक्यातील रामगाव रस्त्यावरील एका शेतात प्रतिबंधित कापूस बियाण्यांची विक्री केली जात असल्याची माहिती दत्तापूर पोलिसांना माहिती मिळाली होती. पोलिस निरीक्षक गिरीश ताथोड यांनी तालुका कृषी कार्यालयाला याबाबत कळविले. त्यानंतर दत्तापूर पोलिस व तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फे या शेतात छापा मारण्यात आला. येथे प्रतिबंधित कापूस बियाण्यांच्या 7 थैल्या जप्त करण्यात आल्या. यात 175 पाकिटांचा समावेश आहे. एका पाकिटाची किमत 901 रुपये असून 1 लाख 57 हजार 675 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तालुका कृषी कार्यालयातर्फे प्रतिबंधित कापूस बियाणांचे नमुने हे तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असल्याची माहिती कृषी कार्यालयाने दिलेली आहे. धामणगाव तालुक्यात अनेक ठिकाणी अशा प्रकारचे बोगस धंदे मागील अनेक वर्षापासून सुरू असल्याची माहिती कृषी खात्याला मिळाली असून त्याविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. असे धामणगाव तालुका कृषी अधिकारी गजानन राऊत यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Back to top button