बालिकेवर सामुहिक बलात्कार : दोघांना 20 वर्ष सश्रम कारावास

10 वर्षांपुर्वीची घटना, वरुड न्यायालयाचा निकाल

-गणेशपूर-जामठीच्या जंगलात केला होता अतिप्रसंग
वरुड / 24 जुलै : नात्यात असल्याचा गैरफायदा घेत एका अल्पवयीन युवतीला फसवून जंगलात नेल्यानंतर दोघांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना 21 मार्च 2015 रोजी गणेशपूर-जामठीनजीक घडली होती. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना आज वरुडच्या अतिरिक्त सत्र न्यायाधिशांनी 20 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे परिसरात गुन्हेगारांमध्ये खळबळ माजली आहे. गेल्या अनेक वर्षांनंतर प्रथमच एखाद्या प्रकरणात न्यायालयाने एवढ्या मोठ्या प्रमाणात शिक्षा दिल्याचे बोलले जात आहे.
रमेश जनार्दन नारनवरे (25, रा. खडका, पो.स्टे.जलालखेडा) आणि मंगेश मोरेश्वर देशभ्रतार (21, रा. तारासावंगा ता. आष्टी) अशी आरोपीची नावे आहेत. प्राप्त माहीतीनूसार, अन्यायग्रस्त युवती ही वरुडपासून जवळच असलेल्या लोणी येथील वार्ड क्र.2 मधील रहिवाशी होती. ती काटोल तालुक्यातील जलालखेडा येथील तिच्या मोठ्या आईकडे गेली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी रमेश जनार्दन नारनवरे हा पिडितेच्या चुलत बहिणीचा दिर होता. त्यामुळे दोघांचा परिचय होता. रमेशची पिडितेवर वाईट नजर होती. घटनेआधी अनेक दिवस रमेश युवतीला मोबाईलवर फोन करुन भेटायची गळ घालून त्रास देत होता.
घटनेच्या दिवशी सदर युवती जलालखेडा येथे तिच्या मोठ्या आईकडे गेली होती. ती जलालखेडा येथून दुपारी मोवाड मार्गे वरुडला जाण्याकरीता निघाली. मोवाड येथे पोहचल्यानंतर रमेश व त्याच्या मित्राने युवतीला गाठून तिच्याशी चर्चा केली. सायंकाळी 5.30 वाजल्यामुळे आता गावाकडे जायला येथून तुला बस मिळणार नाही, आम्ही तुला वरुडला पोहचवुन देतो, असे कारण सांगून दोघांनी त्यांच्या दुचाकीवर युवतीला बसविले आणि गणेशपूर नजीकच्या जामठी येथील जंगलातील टेकड्यावर नेले. सदर युवतीला गावाचा रस्ता माहीत नसल्यामुळे आपण कुठे जात आहोत? हे तिला कळले नाही. टेकड्यावर नेवुन दोन्ही आरोपींनी तिच्यावर सामुहिक बलात्कार केला.
अन्यायग्रस्त युवती नंतर गावात पोहचली आणि तिने आईवडिलांना हकीगत सांगितली. याबाबत युवतीने वरुड पोलिस स्टेशन गाठून दोघांविरुध्द फिर्याद दाखल केली. याप्रकरणी वैद्यकीय तपासणी व सदर युवतीच्या फिर्यादीवरुन वरुड पोलिसांनी रमेश जनार्दन नारनवरे (25) आणि मंगेश मोरेश्वर देशभ्रतार यांच्यावर भादंवि 376 (5) आयपीसी 5 (ग), 6 बाल लैंगीक अत्याचार अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला. दोन्ही आरोपींना तारासावंगा येथून वरुड पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या प्रकरणाचा तपास ठाणेदार अर्जुन ठोसरे, सहाय्यक पोलिस निरिक्षक चित्तरंजन चांदूरे, पोलिस उपनिरिक्षक सुबोध वंजारी, शिवा आठवले, रुपेश येरणे, पुंजाराम मेटकर, शेषराव कोकरे, योगेश नेवारे, चालक जगदीश राठोड यांनी केला.
पोलिसांनी वरुडच्या जिल्हा सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने आरोपी आणि फिर्यादीची बाजु ऐकूण घेत साक्षीदार, तपास अधिकारी यांची सुध्दा उलटतपासणी घेतली. जिल्हा न्यायाधिश (1) तथा अतिरिक्त सत्र न्यायाधिश अमिताभ पंचभाई यांनी रमेश जनार्दन नारनवरे (25) आणि मंगेश मोरेश्वर देशभ्रतार (21) या दोन्ही आरोपींना 20 वर्षे सक्तमजुरी शिक्षा तसेच दोघांनाही पिडीतेला प्रत्येकी 10-10 हजार देण्याचे आदेश दिले. 10 हजार रुपये न दिल्यास अतिरिक्त 6 महिन्यांची सजा सुनावण्याचे आदेश दिले. सरकारी वकिल म्हणुन शासनाची बाजू अ‍ॅड. सुमित घोडेस्वार यांनी मांडली.

संबंधित बातम्या

Back to top button