महालक्ष्मी ज्वेलर्समधील चोरी प्रकरणात आरोपी महिलेला अटक
चोरीचे 3.84 लाखांचे दागीणेही हस्तगत

-आरोपी अकोल्याची रहिवासी
-गुन्हे शाखा युनिट – 1 ची कारवाई
अमरावती / 21 जुलै : ग्राहक बनून आलेल्या एका बुरखाधारी महिलेने दुकानदार आणि कर्मचार्यांना गोष्टीत गुंतवून ठेवून 3 लाख 84 हजार रुपयांचे दागीणे लंपास केल्याची घटना राजकमल ते गांधी चौक मार्गावरील महालक्ष्मी ज्वेलर्स या प्रतिष्ठानात 18 जुलै रोजी घडली होती. या घटनेमुळे खळबळ उडाली असतानाच अमरावती पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट – 1 च्या पथकाने प्रकरणाचा गांभीर्याने तपास करुन आरोपी महिलेला जेरबंद करण्यात यश प्राप्त केले आहे. अकोला शहरातील आकोट फैल भागातून तिला ताब्यात घेण्यात आले. महालक्ष्मी ज्वेलर्समधून चोरलेले सर्व दागीणेही पोलिसांनी या महिलेकडून हस्तगत केले आहे.
प्राप्त माहितीनुसार, शंकर नगर येथील रहिवासी गौरव राजकुमार कोटवानी (36) यांचे गांधीनगर परिसरात अंबादेवी रोडवर महालक्ष्मी ज्वेलर्स हे प्रतिष्ठान आहे. 18 जुलै रोजी बुरखा परिधान केलेली एक अंदाजे 40 ते 50 वयोगटातील अनोळखी महिला ग्राहम म्हणून या दुकानात आली. दागीणे खरेदी करावयाचे आहे, असे सांगून तिने दुकानातील कर्मचार्यांना मंगळसूत्राच्या वेगवेगळ्या डिझाईन दाखवायला सांगितल्या. दागीणे दाखवित असलेल्या महिलेचे लक्ष इतरत्र जाताच या महिलेने 22 कॅरेटच्या सुमारे 25 आणि 15 ग्राम वजनाच्या दोन पेंडेंटवर शिताफीने हात साफ केला. 3 लाख 84 हजार 593 रुपये किंमतीचे हे दागीणे लंपास करुन सदर महिला या दुकानातून निघून गेली.
काही वेळाने दुकानाचे संचालक गौरव कोटवानी यांनी सर्व दागीण्यांची शहानिशा केली असता त्यांना दोन सोन्याचे दोन पेंडेंट गायब असल्याचे आढळून आले. त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरातील फुटेज तपासले असता, त्यात या महिलेच्या संशयास्पद हालचाली कैद झाल्या होत्या. कोटवानी यांनी तात्काळ याबाबत शहर कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात महिलेवर चोरीचा गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली. गुन्हे शाखा युनिट – 1 कडे तपासकार्य सोपविण्यात आले. सीसीटीव्हीतील फुटेजच्या आधारे पोलिसांनी महिलेचा शोध घेतला असता, ती अकोला शहरातील आकोट फैल भागातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली.
गुन्हे शाखेच्या पथकाने अकोला गाठून आकोट फैल येथून या महिलेला अटक केली. महालक्ष्मी ज्वलर्समधून चोरेलेले 3.84 लाखांचे दागीणे या पथकाने महिलेकडून हस्तगत केले. तिला कोतवाली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वात सहायक निरीक्षक मनीष वाकोडे, इमरान नायकवडे, हेड कांस्टेबल माधुरी साबले, फिरोज खान, सतीश देशमुख, सतीश बहाळे, प्रशांत मोहोड, अलीमउद्दीन खतीब, एएसाआई नाजीमउद्दीन सैयद, विकास गुडधे, सचिन भोयर, रणजीत गावंडे, सूरज चव्हाण, निखिल गेडाम, चालक अशोक खंगार, किशोर खेंगरे यांनी केली.




