सैन्यदलाच्या सन्मानार्थ रॅली व शेतकरी कर्जमाफीसाठी ट्रॅक्टर मोर्चा
काँग्रेसने अमरावतीत केले शक्तीप्रदर्शन

* प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी केले सारथ्य
* सरकारविरोधी घोषणांनी परिसर दुमदुमला
अमरावती / 21 मे: दहशतवादा विरोधात राबविण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्य दलाने दाखविलेल्या शौर्याच्या सन्मानार्थ आज अमरावती शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य रॅली काढण्यात आली. सोबतच राज्यातील शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी या मागणीसह शेतकर्यांशी संबंधित अन्य प्रश्नांवर काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढला आणि त्यानिमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शनही केले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वत: ट्रॅक्टरचे स्टेरिंग हाती घेउन या रॅली व मोर्चाचे नेतृत्व केले.
देशाचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांचा स्मृतीदिन आणि दहशतवादविरोधी दिनाचे औचित्य साधून काँग्रेसने या मोर्चा व रॅलीचे आयोजन केले होते. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मंत्री अॅड. यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखडे, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप, काँग्रेसचे शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, मिलिंद चिमोटे, गिरीष कराळे, महेंद्रसिंह गैलवार आदींच्या नेतृत्वात नेहरू मैदान येथून ट्रॅक्टर मोर्चाला सुरूवात झाली. मोठ्या संख्येने शेतकरी व काँग्रेस कार्यकर्ते त्यात सहभागी झाले होते. जयस्तंभ चौक, मालवीय चौक, इर्विन चौक, कॅम्प मार्ग, गर्ल्स हायस्कूल मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात धडकला. येथे काँग्रेस नेत्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना केंद्र व राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
महायुती सरकारने निवडणुकीदरम्यान दिलेला संपूर्ण कर्जमाफीचा शब्द फिरवून राज्यातील शेतकर्यांची फसवणूक केली आहे. आर्थिक संकटात असलेल्या शेतकर्यांवर हा अन्याय असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. हजारो शेतकरी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे अडचणीत सापडले असल्याचे सांगून काँग्रेस नेत्यांनी शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, शेतमालाला आधारभूत हमीभाव द्यावा, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाची तातडीने भरपाई द्यावी, शेतकर्यांना सवलतीच्या दराने नियमित वीज पुरवठा करावा, शेतमाल खरेदीसाठी सरकारी खरेदी केंद्रे तातडीने सुरू करावीत आदी मागण्या केल्या. आजच्या ट्रॅक्टर मोर्चात शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य नागरिक व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अग्रभागी असलेल्या यशोमती ठाकूर यांनी सुरुवातीपासून समारोपापर्यंत माईक हाती घेवून सातत्याने सरकारविरोधात घोषणाबाजी केली. जय जवान जय किसान या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. सरकारचा निषेध करण्यासाठी नारे देण्यात आले.
युद्धबंदीबाबत मोदींकडून लपवाछपवी : सपकाळ
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याने दहशतवाद्यांविरोधात अलौकिक शौर्याचे दर्शन घडविले. त्याचा काँग्रेस पक्षाला सार्थ अभिमान आहे. मात्र युद्धविराम करण्याचा निर्णय साता समुद्रापार असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कसे काय जाहिर करू शकतात? असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी उपस्थित केला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र याचे कारण सांगण्यात असमर्थ ठरत आहेत. ते याबाबत लपवाछपवी करित आहेत असा आरोप त्यांनी केला. एकीकडे जवान सिमेवर लढत आहेत. इकडे शेतकरी शेताच्या राबत आहेत. मात्र केंद्र आणि राज्य सरकारला ना जवानांची काळजी ना शेतकर्यांची. अजूनही राज्यात खरीपाचे नियोजन नाही, कर्जमाफीचा पत्ता नाही, अशा शब्दांत हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारला धारेवर धरले.
तिरंग्याला विरोध करणारे देशभक्ती शिकवतात : ठाकूर
काँग्रेस नेतृत्वाने या देशासाठी रक्त वाहिले आहे. प्रसंगी प्राणांचे बलिदान देखील दिले आहे. पण ज्यांनी कधी आपल्या संस्थांवर तिरंगा फडकवला नाही, तिरंग्याला सतत विरोध केला, ते आज तिरंगा यात्रा काढून आम्हाला देशभक्ती शिकवित आहेत. अशी घणाघाती टीका माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली. दहशतवादी पहलगाममध्ये आलेच कसे आणि हल्ल्यानंतर ते कुठे पळून गेलेत? त्यांना पकडण्याची जबाबदारी कोणाची होती? याचे उत्तर मोदी सरकार देत नाही. निवडणुकीच्या राजकारणासाठी सैन्य दलाच्या शौर्याचा वापर करुन घेतला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर यांच्याकडून तिरंगा यात्रेची नाटके केली जात असल्याची टीकाही ठाकूर यांनी केली.