विधानभवनातील राडा प्रकरणात दोघांना पोलीस कोठडी

पूर्वनियोजित कटाचा पोलिसांना संशय

-दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार
मुंबई / 18 जुलै : विधानभवनातील मारहाण प्रकरणात सर्जेराव टकले आणि नितीन देशमुख या दोघांनाही तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. मुंबई पोलिसांनी या दोघांवर गुन्हा दाखल करत गुरूवारी रात्री उशिरा अटक केली होती. त्यानंतर शुक्रवारी त्यांना मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टापुढं हजर करण्यात आलं. विधानभवन परिसरात कार्यकर्त्यांमध्ये झालेली मारहाण हा एक पूर्वनियोजित कट असल्याचा पोलिसांना संशय आहे. हा कट कुठं रचला?, यात इतर कोण सामील होतं?, याचा तपास आम्हाला करायचाय. त्यामुळं दोन्ही आरोपींकरता सात दिवसांच्या पोलीस कोठडीची पोलिसांनी कोर्टाकडे मागणी केली होती. परंतु कोर्टानं सर्जेराव टकले आणि नितीन देशमुख या दोघांनाही सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
विधानभवन मारहाण प्रकरणी अटक करण्यात आलेल्या नितीन देशमुख आणि सर्जेराव टकले यांना दोघांना पोलिसांनी किल्ला कोर्टात हजर केलं. तेव्हा कोर्ट परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. कालच्या राड्यानंतर दोन्ही बाजूचे नेते आणि कार्यकर्ते कोर्ट परिसरात जमतील. या शक्यतेमुळं पोलिसांनी सारी खबरदारी घेतली होती. कोर्टापुढं नेताच दंडाधिकार्‍यांनी दोघांना पोलिसांकडून काही त्रास आहे का? असं विचारलं. त्यावर दोघांनी, ’नाही’ असं उत्तर दिलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता आणि आरोपी नितीन देशमुखनं विधान भवन परिसरात बेकायदेशीरपणे गर्दी जमा केली. जोरजोरात शिवीगाळ केली. त्यानं हे सर्व पूर्वनियोजित कट कारस्थान रचून केल्याचा संशय आहे.
यात त्याच्यासोबत आणखी कोण होतं, त्याचा तपास करायचाय, अशी माहिती तपास अधिकार्‍यांनी कोर्टाला दिली. तर भाजपाचा कार्यकर्ता सर्जेराव टकले हा पास विनाच बेकायदेशीरपणे विधान भवनात आला होता. तो आत नमेका कसा आला?, याबाबत तपास करायचाय. हे दोघही सराईत गुन्हेगार आहेत. टकलेवर सात तर देशमुखवर सहा गुन्हे आधीपासूनच दाखल आहेत. म्हणून दोन्ही आरोपींची सात दिवसांची पोलीस कोठडी सरकारी वकिलांकडून मागण्यात आली. यावेळी पोलिसांनी आरोपी सर्जेराव टकले आणि नितीन देशमुख या दोघांचंही व्हॉट्सअ‍ॅप मेसेज कोर्टापुढं सादर केले.
याप्रकरणी पोलिसांकडून दोघांवर लावण्यात आलेलं एक कलम सोडून बाकी सर्व कलमं जामीनपात्र आहेत. बीएनएस कलम 132 हा अजामीनपात्र आहे. ज्यानुसार सरकारी अधिकार्‍याला त्याच्या कर्तव्यापासून रोखण्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या संदर्भातील व्हिडिओ नीट पहिला तर दोन्ही आरोपी हे आपसात भांडले आणि त्यानंतर हा वाद झाला हे स्पष्ट होतंय. हा फक्त योगायोग झाला आणि दोघे एकमेकांशी भिडले, यात कोणताही पूर्वनियोजित कट नाही. याशिवाय, भांडणात कुठलंही हत्यार वापरलेलं नाही. त्यामुळं यात चौकशी करण्यासारखं काहीही नसल्यानं त्यांना न्यायालयीन कोठडी द्यावी, असा युक्तिवाद बचावपक्षाकडून करण्यात आला होता.

संबंधित बातम्या

Back to top button