एसए इंपेरियल बारच्या मालक-व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

राजकुमार सुंदरानी हत्या प्रकरण

-रजिस्टरवर खोलीची नोंद नव्हती
-आरोपींकडून ओळखपत्रही घेतले नाही
नांदगावपेठ / 16 जुलै: नांदगाव पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत रहाटगाव येथील एस.ए. इम्पेरियल बारमधील लॉजिंगमध्ये मद्य पार्टीनंतर झालेल्या राजकुमार सुंदरानी यांच्या खून प्रकरणात आता बारमालक व व्यवस्थापक अडचणीत आले आहेत. आरोपींचे ओळखपत्र न तपासताच खोली दिली गेल्याचे तपासात निष्पन्न झाले. तसेच रजिस्टरवर खोली दिल्याची नोंद न घेतल्याने नांदगावपेठ पोलिसांनी बारमालक व व्यवस्थापका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
12 जुलै रोजी रात्री, आरोपी बंटी पवार (30, रा. लोहार लाईन, विलासनगर) व शिवा फुलवाणी (42, रा. रामपुरी कॅम्प) यांनी राजकुमार तहलराम सुंदरानी (54, रा. साई मंदिराजवळ, रामपुरी कॅम्प) यांच्यासोबत एसए इम्पेरियल बारच्या खोली क्रमांक 102 मध्ये मद्यपान केले. यावेळी अन्य दोन मित्र रवी तेजानी व अजय मेटानी हे सुद्धा खोलीत होते. मध्यरात्री 3 वाजता बारबाहेर आल्यानंतर किरकोळ कारणावरून आरोपी बंटी पवार, शिवा फुलवानी व राजकुमार सुंदरानी या तिघांमध्ये वाद उफाळून आला. या वादाचे पर्यवसान चाकू हल्ल्यात झाले आणि आरोपी बंटी पवार व शिवा फुलवानी यांनी बारसमोरच राजकुमार सुंदरानी यांची हत्या केली. हत्या झाल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते.
घटनेनंतर पोलिस तपास सुरू झाला. बारमधील लॉजिंग रजिस्टरमध्ये आरोपींच्या नावाची तसेच खोली दिल्याची नोंद नसल्याचे तसेच त्यांच्याकडून कोणतेही ओळखपत्र हॉटेलने घेतले नव्हते, असे पोलिस चौकशीत निष्पन्न झाले. बार व्यवस्थापनाच्या या निष्काळजीपणामुळे नांदगावपेठ पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल संजय धनराज देऊळकर यांच्या तक्रारीवरून बारमालक मुद्दतसर अली व व्यवस्थापक विजय पुरणलाल खत्री (दोघेही रा. अमरावती) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 सहकलम मदाका 82 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान फरार आरोपी बंटी पवार व शिवा फुलवाणी यांना राजस्थानमधील कोटा शहरातून सोमवारी अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींना 18 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून नांदगाव पेठ पोलीस आरोपींची कसून चौकशी करत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button