शशिकांत शिंदे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष
मुंबईतील बैठकीत झाली घोषणा

-एकमतानं मंजूर झाला प्रस्ताव
-जयंत पाटील यांचा राजीनामा
मुंबई / 15 जुलै: दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा जयंत पाटील यांनी राजीनामा दिला होता. यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्वसाधारण बैठकीत नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. मंगळवारी दुपारी 3 वाजता मुंबईत वाय बी चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची सर्वसाधारण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा केली.
दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यावर पक्षाला यश मिळवून देण्याची मोठी जबाबदारी आली आहे. जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर शशिकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरु होती. आज त्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून शशिकांत शिंदे यांच्या निवडीनंतर आता पक्ष वाढीसाठी त्यांच्याकडून करण्यात येणार्या प्रयत्नांकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं आहे.
वाय बी चव्हाण सेंटरमध्ये पार पडलेल्या या बैठकीला शरद पवार, जयंत पाटील, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, हर्षवर्धन पाटील, शशिकांत शिंदे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी अनिल देशमुख यांनी नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी शशिकांत शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवल्यानंतर हा प्रस्ताव एकमतानं मंजूर करण्यात आला. त्यानंतर शरद पवार यांनी पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा केली.
काही दिवसापूर्वी एका कार्यक्रमात जयंत पाटील यांनी आपल्याला या पदावरून मुक्त करावं आणि नव्या लोकांना संधी द्यावी, अशी जाहीर मागणी केली होती. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली होती. तसंच त्यांच्या भाजपा प्रवेशाच्या वावड्या उठल्या होत्या. दरम्यान, पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय पदाधिकार्यांच्या बैठकीत होणार असल्यानं आजच्या बैठकीकडे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचं लक्ष लागलं होतं. याशिवाय, विधानसभा निवडणुकीतील अत्यल्प यशानंतर पक्षाच्या कार्यकारिणीत बदल करावा, अशी मागणी सुरू झाली होती.
-शरद पवारांसोबतच राहणार : जयंत पाटील
जयंत पाटील यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावं, अशी जाहीर मागणी केल्यानंतर त्यांच्या या विधानाबाबत उलटसुलट चर्चा सुरु होत्या. पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते भाजपामध्ये जाणार असल्याची चर्चा देखील सुरु होती. मात्र, जयंत पाटील यांनी आपण शरद पवारांसोबतच असून कुठंही जाणार नाही, असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलं आहे.




