बच्चू कडूंची पदयात्रा राळेगावात पोहोचली

आंदोलनात स्थानिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

– ‘बटेंगे तो कटेंगे…’, जर्सीने वेधले लक्ष
यवतमाळ / 11 जुलै: शेतकरी कर्जमाफीकरिता बच्चू कडू यांच्या नेतृत्वात पापळ ते चिलगव्हाण ‘7/12 कोरा कोरा’ यात्रा यात्रा सुरु आहे. या आंदोलनात राळेगाव येथील युवा शेतकर्‍यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. राळेगाव नगर पंचायतचे सदस्य मंगेश राऊत, प्रहार तालुका अध्यक्ष संजय दुरबुडे, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राळेगाव तालुका अध्यक्ष दिलीप कन्नाके, राहुल बहाळे, नितीन कोमरवार यांनी पदयात्रेमध्ये सक्रिय सहभाग घेतला.
‘मातीच्या स्वातंत्र्याचा लढा’ हा उद्देश ठेवून शासनाला जागे करण्यासाठी शेतक्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी ही यात्रा यवतमाळ जिल्ह्यात दाखल झाली. सोमवारी अंबोडा येथे सभा होणार असून त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन बच्चू कडू यांनी केले. बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील ही पदयात्रा हा शेतक्यांचा हुंकार आहे. शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, कष्टकरी यांच्या अस्तित्वाचा हा लढा आहे. पक्ष, विचारधारा, राजकीय भूमिका या पलीकडे जाऊन शेतक्यांसाठी कुणीही रस्त्यावर उतरत असेल तर त्या प्रयत्नाला प्रत्येकाने साद देणे, प्रतिसाद देणे ही आज काळाची गरज ठरते. राळेगाव येथील अनेक सहकारी यात सहभागी झाले. शेतक्यांसाठी एकत्र होणे आवश्यक आहे, असे राळेगावचे नगरसेवक मंगेश राऊत यावेळी म्हणाले.
आज बच्चू कडू यांच्या 7/12 कोरा यात्रेत बटेंगे तो कंटेंगेचा टीशर्ट घालून एक युवा शेतकरी सहभागी झाला. त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. निवडणुकीत जात, पात, धर्म पाहून मत दिलं मात्र शेतकरी म्हणून आम्ही एक व्हायचं विसरून गेलो. त्यामुळेच सरकारने शेतकर्‍याला फसवलं. भर सभेत आश्वासन देऊनसुद्धा शेतकरी कर्जमाफी सरकारने अद्याप दिलेली नाही. आता वेळ आलीय बटेंगे तो कंटेंगे असं म्हणत शेतकरी म्हणून एकत्र येण्याची. जात, पात, धर्म, राजकीय विचार बाजूला ठेऊन शेतकरी म्हणून एक व्हा. मत कोणालाही द्या पण शेतकर्‍यांसाठी एक व्हा. आता कर्जमाफी घेतल्याशिवाय थांबायचं न्हाय, असे बच्चू कडू यावेळी म्हणाले. आज यवतमाळ जिल्ह्यातील भाजपचे आमदार राजू तोडसामा यांच्या पत्नीसुद्धा बच्चू कडू यांच्या पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या. त्यांनी बच्चू कडू यांच्या शेतकर्‍यांसाठीच्या लढ्याला पाठिंबा दर्शविला.

 

संबंधित बातम्या

Back to top button