चर्चेनंतर प्रश्न सुटला, शिक्षकांचं आंदोलन स्थगित
मंत्री गिरीश महाजनांची यशस्वी शिष्टाई

-18 जुलैपर्यंत मिळणार चौथ्या टप्प्याचे पगार
मुंबई / 9 जुलै: राज्यातील पाच हजारांहून अधिक अंशत: अनुदानित खासगी शाळांना अनुदानाची टप्प्याटप्प्यानं अंमलबजावणी करण्याचा निर्णय सरकारनं ऑक्टोबर 2024 मध्ये घेतला. मात्र, हा निर्णय गेले 10 महिने उलटूनही कागदावरच असून निधीची तरतूद न झाल्यानं राज्यातील शिक्षकांनी 8 आणि 9 जुलै रोजी शाळा बंद ठेऊन आझाद मैदानावर तीव्र आंदोलन छेडलं होतं. आंदोलनादरम्यान आज सरकार आणि शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींची चर्चा झाली. त्यानुसार 18 जुलै दरम्यान चौथ्या टप्प्याचे पगार शिक्षकांच्या खात्यात जमा होतील, असं आश्वासन सरकार तर्फे मंत्री गिरीश महाजन यांनी दिलं. त्यामुळे गिरीश महाजन यांच्या शिष्टाईनंतर हे आंदोलन सध्या स्थगित करत असल्याचं शिक्षक समन्वय संघानं घोषित केलं.
याबाबत गिरीश महाजन यांनी बोलताना सांगितलं की, आधी महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यांनी त्यांच्या दालनात तरी तुम्हाला प्रवेश दिला का? त्यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. तुम्ही कोणावरही विश्वास ठेऊ नका. आमच्या शिवाय कोणीही तुमचं काम करू शकणार नाही. 18 तारखेला अधिवेशन संपलं की तुमच्या खात्यात पगार जमा झालेला असेल. तुमच्या खात्यावर आधीचे टप्पे आम्हीच टाकले आहेत. सुरुवात आम्हीच केली आहे. ही तारीख पुढं जाणार नाही, असं त्यांनी सांगितलं. सर्वाना हा निर्णय कळवा, आमचं सरकार आणि शिक्षक आमदार यांच्याकडून प्रयत्न करून अधिवेशनातून घरी जाताना तुमचा पगार तुमच्या खात्यात टाकूनच आम्ही जाऊ, असं आश्वासन गिरीश महाजन यांनी यावेळी दिलं.
यावेळी संचालकांनी या आंदोलनादरम्यान ज्या शिक्षकांचे पगार कापावे असं पत्रक काढलं आहे, ते मागं घ्यावं अशी मागणी शिक्षक संघटनांकडून केली गेली. यावर महाजन यांनी सांगितलं की ते पत्र मागं घेतलं जावं असे आदेश मुख्यमंत्र्यांनी द्यावेत, अशी विनंती मी करेन. एक महिन्यापासून शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाकडं सरकारनं सपशेल दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त शिक्षकांनी मंगळवारी आणि बुधवारी शाळा बंद ठेवून तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यावर सोमवारी प्रशासनाकडून विद्यार्थी हिताचा निर्णय घेऊन शाळा सुरू ठेवाव्यात असं पत्रक काढण्यात आलं. मात्र, हा आदेश धुडकावून लावत मंगळवारी राज्यभरातील 15 हजाराहून अधिक शिक्षकांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता. मंगळवारपासून आमदार रोहित पवार यांनी आझाद मैदानावर ठिय्या देत शिक्षकांना पाठिंबा दिला होता. दुपारनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. यानंतर मात्र मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलक शिक्षकांना भेट देत आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवतो, असं आश्वासन दिलं होतं. तसेच आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार निलेश लंके यांच्यासह आझाद मैदान इथं भेट देत शिक्षकांना पाठिंबा दर्शवला होता.




