बडोद्यामधील महिसागर पुल कोसळला; 9 जणांचा मृत्यु

अनेक वाहनं नदीत पडली

-थरारक घटना, ट्रक टोकाला अडकला
बडोदा / 9 जुलै: गुजरातमधील बडोद्यामधील महिसागर नदीवर असलेल्या पुलाचा एक भाग कोसळला. या घटनेत अनेक वाहनं पुलावरुन नदीत कोसळली, यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी आहेत. ही घटना बडोद्यामध्ये बुधवारी पहाटे घडली. गुजरातमधील बडोद्यातील पड्रा तालुक्यातील मुजपूर येथे पूल कोसळण्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. व्हिडिओमध्ये एक टँकर कोसळलेल्या पुलाच्या टोकाला उभा असलेला दिसत आहे. तसेच एक महिला मुलाला वाचवण्यासाठी जोरजोरात ओरडत असल्याचा आवाज येत आहे. पाण्यात पडलेल्या एका गाडीमध्ये त्या महिलेचा मुलगा असल्याचे दिसत आहे.
बडोद्यातील पूल दुर्घटनेची माहिती जिल्हाधिकारी अनिल धामेलिया यांनी दिली. ते म्हणाले की, या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. पाच जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश आले. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यां लोकांची ओळख अजून पटलेली नाही. दुर्घटनास्थळी अजुनही बचावकार्य सुरु आहे. पुलाचा भाग अचानक कोसळल्यामुळे पुलावरुन दोन ट्रक, दोन व्हॅन, आणि एक अ‍ॅटो रिक्षा नदीत पडली. पूल कसा कोसळला याची चौकशी केली जाईल असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. दुर्घटनेनंतर अग्निशमन दल, एनडीआरएफचे पथक बचावकार्य करत आहे. ज्या भागात पुल कोसळला तो फार खोल भाग नाही, त्यामुळे बचावकार्याला वेग आला आहे. मृतांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरु आहे.
बडोद्यातील या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये पंतप्रधानांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपये देण्याची घोषणा केली. हा पूल 43 वर्षे जुना होता. मागील वर्षी या पुलाची दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतरही पूल कसा काय कोसळला याची आम्ही तपासणी करणार असल्याचे जिल्हाधिकारी धामेलिया म्हणाले.

संबंधित बातम्या

Back to top button