उमादेवी बजाज यांच्या नेत्रदानातून दोघांना मिळणार दृष्टी
बजाज कुटुंबाच्या निर्णयाचे सर्वत्र कौतूक

-हरिणा फाउंडेशनने पूर्ण केली प्रक्रिया
अमरावती / 9 जुलै: श्रीकृष्ण पेठ येथील रहिवासी उमादेवी भवरलाल बजाज यांचे 5 जुलै रोजी हृदयविकाराने निधन झाले. त्यानंतर बजाज कुटुंबाने उमादेवी यांचे मरणोपरांत नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला व संकल्प पूर्ण केला. हरिना फाउंडेशनच्या माध्यमातून उमादेवी बजाज यांच्या नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. उमादेवी यांच्या नेत्रदानामुळे आता दोन अंध व्यक्तींना दृष्टी मिळणार असून त्यांना अंधकारमय जीवनात प्रकाशवाट गवसणार आहे.
उमादेवी बजाज या अमरावतीच्या श्रीकृष्ण पेठ येथे राहणार्या आनंद श्रीगोपाल बजाज यांच्या आजी आणि गोपाल सेल्सचे संचालक गोपाल बजाज आणि दामोदर बजाज यांच्या मातोश्री होत्या. वयाच्या 80 व्या वर्षी 5 जुलै रोजी उमादेवी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यानंतर बजाज परिवाराने उमादेवी यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपला हा संकल्प डॉ. श्रीगोपाल राठी यांना कळविला आणि त्यांच्या माध्यमातून नेत्रदानासाठी हरिना फाउंडेशनचे डॉ. नंदकिशोर लोहाना यांच्याशी संपर्क साधण्यात आला. बजाज कुटुंबाने उमादेव यांच्या नेत्रदानाची इच्छा व्यक्त केल्यानंतर डॉ. नंदकिशोर लोहाना यांनी आपल्या चमुशी चर्चा केली. लगेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉ. अंकुश गोळंबे आणि नीलेश डेंगळे यांनी ही नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण केली.
यावेळी दिवंगत उमादेवी बजाज यांच्या परिवारातील डॉ. श्रीगोपाल राठी, नितिन चांडक, राजेंद्र हेडा, नितीन सारडा, जगदीश कलंत्री, सुनील मुंदडा, सुभाष राठी, अनुज बजाज, साकेत मेहता, सुशील सारडा, दीपक हेडा, कमल राठी उपस्थित होते. तसेच हरिनाच्या वतीने नेत्रदान प्रमुख शरद कासट, सचिव राजेंद्र वर्मा, रामप्रकाश गिल्डा, डॉ. नंदकिशोर लोहाना यांची उपस्थिती होती. या दोन डोळ्यांमुळे आता अंधकारात जीवन जगणार्या दोन व्यक्तींच्या जीवनात प्रकाशाची किरण येणार आहे. या समाजाभिमुख निर्णयाबद्दल बजाज कुटुंबियांचे कौतूक करण्यात येत आहे.
हरीना फाउंडेशन हे नेत्रदान, अवयव दान, देहदान या क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करित आहे. आतापर्यंत हजारावर लोकांना त्यामाध्यमातून जीवनदान मिळाले आहे. तसेच अनेकांच्या जीवनातील अंधार दूर झाला आहे. अमरावतीमध्ये हरीना नेत्रदान फाउंडेशन ही संस्था कुणाला नेत्रदान, अवयव दान, देहदानाच्या महान कार्यासाठी संपर्क करावयाचा असल्यास 9823163331 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन हरिना फाउंडेशनने केले आहे.




