अंजनगाव सुर्जीत 2.44 लाखांचे बोगस बियाणे जप्त

वेषांतर करुन कृषी अधिकार्‍यांनी केली कारवाई

-गैरप्रकार थांबविण्याचे प्रशासनासमोर आव्हान
अंजनगाव सुर्जी / 20 मे: अमरावती जिल्ह्यात अवैध कपाशी बियाणे दाखल झाल्याची माहिती मिळाली असतानाच त्याच्या विक्रीला प्रतिबंध घालण्यासाठी कृषी विभागाने कंबर कसली असल्याचे दिसून येत आहे. त्याअंतर्गत अंजनगाव सुर्जी येथे कारवाई करुन बोगस कपाशी बियाण्यांची 2 लक्ष 44 हजार रुपये किंमतीची 174 पाकिटे कृषी विभागाच्या पथकाने जप्त केली आहे. त्यात विक्रीसाठी परवानगी नसलेल्या एचटीबीटी कापूस बियाण्यांचा समावेश आहे. बोगस बियाण्यांविरोधातील ही तालुक्यातील पहिलीच कारवाई आहे. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईमुळठे तालुक्यात बोगस बियाण्यांच्या विक्रीचा गोरखधंदा करणार्‍यांचे धाबे दणाणल्याचे बोलले जात आहे.
सोमवारी शहरातील देवनाथ नगर परिसरात सापळा रचून एका घरावर छापा मारत ही कारवाई करण्यात आली. येथे प्रतिबंधीत एचटीबीटी बियाण्याचा साठा पकडण्यात आला. बोगस बियाण्यांची 174 पाकिटे आढळॅन आलीत. त्याची किंमत 2 लक्ष 44 हजार 387 रुपये असल्याचे सांगण्यात आले. आरोपी विनोद वा. सरोदे (54) हा अनेक दिवसांपासुन एचटीबीटी बियाण्याचा अवैध व्यवसाय करतो, अशी माहिती कृषी खात्याला मिळाली होती. त्याआधारे पंचायत समितीचे कृषी अधिकारी अश्विन राठोड यांनी शेतकर्‍याचे वेष धार करून आरोपी विनोद सरोदेशी संपर्क साधला व बियाण्यांची मागणी केली. आरोपीने बियाणे विकत देण्याचे मान्य केल्यानंतर कृषी विभागाच्या पथकाने पोलिसांच्या सहकार्याने सरोदेच्या घरावर छापा मारला आणि त्याचा गोरखधंदा उघडकीस आणला.
घराच्या झडतीत या पथकाला अनधिकृत बियाण्यांचा साठा आढळून आला. त्यामध्ये एचटीबीटी बियाण्याचे 174 पाकिटे आढळली. त्यामध्ये अजीत 155-4 जी, आरआर 659, गोल्ड 5-जी, एसएटी महाशक्ती 5-जी, सुमो गोल्ड 5-जि, साकेत गोल्ड, ग्लायकोगार्ड एच 101 या बियाण्यांचा समावेश होता. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, कृषी विकास अधिकारी मल्ला तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील अचलपूरचे उपविभागीय कृषी अधिकारी प्रफुल्ल सातव, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विराग देशमुख, तालुका कृषी अधिकारी भारती जाधव, कृषी अधिकारी नरेंद्र वसुकर, कृषी अधिकारी अश्विन राठोड यांनी ही कारवाई केली. आरोपी विनोद सरोदे याच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करुन त्याला अटक करण्यात आली. ही कारवाई सकाळी तीन वाजेपर्यंत चालली. असून पुढील तपास ठाणेदार अवतारसींग चव्हान यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरिक्षक सागर भाष्कर, हे.का. प्रमोद चव्हाण करीत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button