पोलीस वाहनाची दोन वाहनांना धडक,दोन जण जखमी

अर्जुन नगर परिसरात पोलीस आणि नागरिकांत तू तू मै मै

-ठाणेदारांची नागरिकांना मारहाण
घटनास्थळी पोलिसांविरोधात प्रचंड असंतोष
नांदगाव पेठ/20 मे : अमरावती वरून रहाटगावकडे जाणार्‍या एका पोलीस वाहनाने अर्जुन नगर बस स्टॉपजवळ भरदिवसा अपघाताची मालिका घडवून आणल्याने परिसरात खळबळ उडाली. आधी एका चारचाकी वाहनाला धडक दिल्यानंतर, तेच पोलीस वाहन रिव्हर्स घेत असताना मागून येणार्‍या टेम्पोला जबर धडक दिली. या धडकेत टेम्पोतील दोन जण गंभीर जखमी झाले.अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि दोन्ही वाहनांचे मालक संतप्त झाले. त्यांनी पोलिसांच्या बेफिकीर आणि बेजबाबदार वागणुकीचा समाचार घेत पोलिसांना नूकसानभरपाईची मागणी केली. यावेळी अर्जुन नगर परिसरात पोलीस आणि नागरिकांमध्ये तू तू मै झाली तर घटनास्थळी दाखल झालेल्या गाडगेनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांनी नागरिकांना दमदाटी करून त्यांना मारहाण केल्याचेही समजते.
घटनेची सविस्तर हकीकत अशी की,अमरावती वरून रहाटगाव कडे जाणार्‍या पोलीस वाहन क्र.एम. एच.27,डी.एल.6259 ने अर्जुन नगर बस स्टॉप वरून वळण घेणार्‍या एम एच 46,एक्स 0327 क्रमांकाच्या वाहनाला जबर धडक दिली. त्यांनतर लगेच पोलिसांच्या वाहनाने रिवर्स घेतला त्यात मागून येणार्‍या एम एच 27 बी एक्स 0050 क्रमांकाच्या बोलेरो पीक अप वाहनाला सुद्धा धडक दिली यामध्ये दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले तर बोलेरो पीक अप वाहनामधील दोन जण जखमी सुद्धा झाले. घटनेनंतर वाहन मालक आणि स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या बेजबाबदार वागणुकीचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी वाहनांचे नुकसान झाल्यामुळे दोन्ही वाहन मालकांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली तर पोलीस कर्मचार्‍यांनी त्यांना दमदाटी करत मुजोरपणाची भूमिका वठविली.
त्यानंतर लगेच गाडगेनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार ब्रम्हगिरी तसेच इतर पोलीस कर्मचार्यांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. तेव्हा नागरिक आणि वाहन मालकांची बाजू समजून न घेता तुम्हाला आत टाकेल असे म्हणत काही नागरिकांना मारहाण केली तर बोलेरो पीक वाहन आणि त्यातील दोन जखमींना बळजबरीने पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले मात्र तेथे त्यांची तक्रार न घेता त्यांना हुसकून लावण्यात आले. घटनेतील दुसरे अपघातग्रस्त वाहनाचे चालक सुधीर पेठे यांनी तक्रार दाखल केली मात्र त्यांच्या तक्रारीला सुद्धा बेदखल करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
या प्रकारामुळे पोलीस दलाच्या दबंग आणि गैरजबाबदार वागणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, सामान्य जनतेमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. नागरिकांनी निष्पक्ष चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.यासंदर्भात पोलीस आयुक्त, गृहमंत्री यांना सुद्धा तक्रार पाठविण्यात आली असल्याचे समजते.

संबंधित बातम्या

Back to top button