चांदूर रेल्वेच्या दोघांना पुण्यात 250 किलो गांजासह अटक

शिरूरमध्ये पोलिसांची सिनेस्टाईल पाठलाग करून कारवाई

महिंद्रा कारसह 1 कोटी 51 लाखांचा मुद्देमाल जप्त

चांदूर रेल्वे /26 नोव्हेंबर- पुणे शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने शिरूर परिसरात मोठी कारवाई करत गांजाची तस्करी करणार्‍या चांदूर रेल्वे तालुक्यातील 2 तरुणांना अटक केली आहे. पोलिसांनी चित्रपटातील पाठलागाप्रमाणे संशयित वाहनाचा पाठलाग करून त्याला घेराव घातला. वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये तब्बल 250 किलो गांजा आढळून आला. या कारवाईत महिंद्रा एक्सयूव्ही-700 मोटारीसह एकूण 1 कोटी 51 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. समीर पुरुषोत्तम राऊत (24, रा. सांगोलवाडा) आणि अजय जगदीश मोहिते (30, रा. बागापूर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
पुणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथक क्रमांक 2 ला गांजाची मोठी खेप वाहून नेली जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पुणे ग्रामीणमधील शिरूर परिसरात लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. यावेळी संशयास्पद वाहन दिसताच पोलिसांनी त्याचा पाठलाग केला आणि योग्य संधी साधून वाहन अडवले. झडतीदरम्यान मोटारीत मोठ्या प्रमाणात गांजा आढळल्याने दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. या दोघांचे अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्याशी संबंध असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा ते पुण्यात कोणाला देणार होते, या तस्करीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे आणि यामागे मोठे जाळे कार्यरत आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या कारवाईची माहिती पुणे गुन्हे शाखेतील अमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी दिली. पुढील तपास सुरू असून या प्रकरणातून आणखी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.

Back to top button