अमरावतीच्या रमेश चौधरींचा पुणे एक्सप्रेसमध्ये मृत्यु

अमरावती / 4 जुलै: पुणे-अमरावती एक्सप्रेसमधून प्रवास करित असलेले अमरावती येथील रहिवासी रमेश महादेव चौधरी (75) यांचा गाडीतच अकस्मात प्रकृती बिघडून मृत्यु झाला. शेगाव-अकोला दरम्यान ही घटना उघडकीस आली. रमेश चौधरी हे बागीतील शौचालयात अत्यवस्थ अवस्थेत आढळून आले. रेल्वे पोलिसांनी त्यांना अकोला येथे शासकिय रुग्णालयात उपचारासाठी नेल, पण त्यांचा मृत्यु झाला होता.
रमेश चौधरी हे मुळ अमरावतीचे रहिवासी होते आणि गेल्या काही वर्षांपासून ते पुणे येथे आपला मुलगा राहुल चौधरी याच्याकडे वास्तव्यास होते. काही कामानिमित्त ते पुणे-अमरावती एक्सप्रेसने अमरावतीला येत होते. शेगाव-अकोला दरम्यान रमेश चौधरी हे बोगीतील शौचालयात गेले. बराच वेळ झाल्यानंतरही ते बाहेर आले नाही. त्यामुळे अन्य प्रवाशांनी शौचालयाचे दार वाजवून त्यांना आवाज दिला. परंतू आतून प्रतिसाद मिळाला नाही. याची माहिती अकोला रेल्वे पोलिसांना दिली.
गाडी अकोला रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर रेल्वे पोलिसांनी शौचालयाचे दार तोडले. तेव्हा आतमध्ये रमेश चौधरी हे अत्यवस्थ अवस्थेत आढळून आले. त्यांना तात्काळ शासकिय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अकोला पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली असून रमेश चौधरी यांचा मुलगा राहुल चौधरी यांना याबाबत पुणे येथे सूचना देण्यात आली.

संबंधित बातम्या

Back to top button