मोटरसायकल अपघातात एक ठार, एक गंभीर

जंगली डुकराने केला घात!

-मोर्शी-अमरावती मार्गावरील घटना
मोर्शी / 4 जुलै: मोर्शी अमरावती मार्गावर वैद्य डॉग सेंटर समोर मोटर सायकलच्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला, तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला. जखमीला अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना आज, शुक्रवारी दुपारी 12 वाजताचे सुमारास घडली. मृतक युवकाचे नाव मयूर हरिभाऊ बरांगे (22, रा. काठी वाडेगाव) असे आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वरुड तालुक्यातील काठी (वाडेगाव) येथील रहिवासी असलेला मयूर हरिभाऊ बरांगे आणि त्याचा मित्र यश बाळू जाधव (24, रा. वरुड) हे दोघे मोटरसायकल क्र. एमएच 31 / एफटी 8496 वरुडहून मोर्शी मार्गे काही कामानिमित्त अमरावती येथे जात असतांना वैद्य डॉग सेंटरसमोर त्यांना रानडुक्कर आडवे आले. मोटरसायकलची डुकराला जोरदार धडक बसली आणि त्यात रानडुक्कर जागीच ठार झाले. सोबतच मोटरसायकलवरील दोन्ही युवक फेकले जावून रस्त्यावर आदळल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. दोघांच्याही डोक्याला जबर मार बसला.
घटनेची माहिती मिळताच सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणार्‍या तानाजी युवा बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल पंडागरे, रवी परतेती, श्याम मोरे, यश पांडे, अभिषेक झोड, तेजस नागले यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही जखमींना रुग्णवाहिकेतून मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. मात्र उपचारादरम्यान मयूर बरांगे याचा मृत्यू झाला. यश जाधव याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला अमरावती येथे हलविण्याचा सल्ला उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिला. त्यानंतर तानाजी बहुउद्देशीय संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गंभीर जखमी यश जाधव याला अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले.

संबंधित बातम्या

Back to top button