पावसामुळे नांदगाव पेठ परिसरातील शेतकर्‍यांचे विद्युत उपकरणे जळाली

नितीन हटवार यांची नुकसानभरपाईची मागणी

नांदगाव पेठ/20 मे : मागील दोन-तीन दिवसांपासून नांदगाव पेठ परिसरात सुरू असलेल्या वादळी वार्‍यासह मुसळधार पावसामुळे अनेक शेतकर्‍यांचे विद्युत उपकरणे जळून खाक झाली आहेत. विजांच्या कडकडाटामुळे व विद्युत तारांवर आलेल्या झाडांच्या फांद्यांमुळे वादळात तारांचा परस्पर स्पर्श होऊन हाय व्होल्टेज निर्माण झाले. यामुळे अनेक शेतकर्‍यांचे स्टार्टर, विद्युत मोटर पंप आणि अन्य कृषी उपकरणे खराब झाली.
या घटनेमुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांवर आणखी आर्थिक संकट कोसळले आहे.वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळेच हा प्रकार घडला असल्याचा आरोप करत माजी जिल्हा परिषद सदस्य व शिवसेना तालुका प्रमुख नितीन हटवार यांनी शेतकर्‍यांना नैसर्गिक आपत्ती अंतर्गत नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.
शेतकर्‍यांच्या म्हणण्यानुसार, विद्युत विभागाने वेळेवर झाडांची छाटणी केली असती तर ही हानी टाळता आली असती. येथील शाखा अभियंत्यांनी तातडीने सर्वेक्षण करून नुकसान झालेल्या शेतकर्‍यांची यादी संबंधित विभागाकडे सादर करून त्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांकडून करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button