योगासने व प्राणायामाने शरीर सुदृढ व निरोगी बनते

प्रमोद पोकळे यांचे प्रतिपादन

गुरुकुंज-मोझरी/20 मे : व्यायामे जडत्व जाई दुरी, अंगी येई तरतरी, रक्त-व्यवस्था उत्तम शरीरी, वाढे विचारी सजीवपण असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत म्हटल्याप्रमाणे योगासने व प्राणायामाच्या नियमित सरावाने व्यक्तीचे मन, मनगट आणि मस्तक मजबूत होत असल्याने बाल-तरुणांनी शालेय अभ्यासासोबतच सूर्य-नमस्कार, व्यायाम व मैदानी खेळ खेळावेत. कारण योगासने व प्राणायामाने शरीर सुदृढ, लवचिक आणि निरोगी बनते, असे प्रतिपादन दूरदर्शन व आकाशवाणी लोक-कलावंत प्रमोद पोकळे यांनी केले.
गुरुकुंज-मोझरी नजिकच्या राष्ट्रसंत अध्यात्म केंद्र, दासटेकडी येथे 1 मे पासून आरंभ झालेल्या श्रीगुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिरातील विद्यार्थ्यांना सूर्य-नमस्कार, योगासने व प्राणायाम या तासिकेत व्यायामाचे महत्त्व विशद करताना प्रमोद पोकळे बोलत होते. आज सर्वजण मान, पद, प्रतिष्ठा, पैसा, करिअर यामागे लागले असून चुकीच्या सवयीत अडकल्याने कमी वयात अटॅक व विविध महाभयंकर दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत. यावर व्यायाम हा रामबाण उपाय असून निरोगी जीवनाचा मूलमंत्र आहे, असेही ते म्हणाले. संपूर्ण लोक-सहकार्यावर चालणार्‍या या शिबिरात विदर्भातील सुमारे 120 शिबिरार्थी दाखल झाले असून देश-धर्म-संस्कृतिच्या संवर्धनार्थ बौद्धिक, व्यायाम व भजन-संगीताचे शिक्षण सेवाभावी शिक्षकांकडून दिले जात आहे.
श्रीगुरुदेव राष्ट्रधर्म प्रचार संस्थेद्वारा सुमारे 21 दिवस चालणार्‍या या शिबिराच्या यशस्वितेसाठी शिबीर-प्रमुख रवींद्र ढवळे, रूपेश मोरे, गणेश दरवरे, योगेश मेंढे, मयुर इंगळे, वेदांत अढाऊ, नयन प-हाड, ओम् नन्नावरे, कुंदन गुडधे, पुष्कर गुडधे, निवृत्ती इंदुरकर, अरुण फंदे, हभप दिनकर चोरे, प्रमोद पोकळे, डॉ.नरेंद्र तराळे, अभिनय काळे, छगनराव मोरे, सदानंद जोगी तर व्यवस्थापनाची जबाबदारी रवींद्र वानखडे सांभाळत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button