कर्जमाफी झालेल्या शेतकर्‍यांना बँकांनी पीककर्ज द्यावे

जिल्ह्यातील 600 सेवा सहकारी संस्थांना कारणे दाखवा नोटीस

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे निर्देश

अमरावती /23 ऑक्टोबर  : राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत शेतकर्‍यांना लाभ देणे सुरू केले आहे. या योजनेंतर्गत कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकर्‍यांना नव्याने पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले. तसेच कर्ज वाटप करण्यासाठी टाळाटाळ करणार्‍या जिल्ह्यातील 600 सेवा सहकारी संस्थांना सहाय्यक निबंधकांमार्फत कारणे दाखवा नोटीस बचावण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवार, दि. 22 ऑक्टोबर रोजी बँकांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. मागील आढावा बैठकीमध्ये अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवीन पीक कर्जवाटप अत्यल्प असल्याबाबत जिल्हाधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच, सेवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून पात्र शेतकर्‍यांना नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रभावी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व सहायक निबंधकांमार्फत जिल्ह्यातील 600 सेवा सहकारी संस्थांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या शेतकर्‍यांना नवीन पीक कर्ज तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी सेवा सहकारी संस्थांनी सक्रिय भूमिका घ्यावी, तसेच संबंधित शेतकर्‍यांना कर्जप्राप्तीसाठी आवश्यक सहकार्य करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. आढावा बैठकीमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नवीन पीक कर्जवाटपामध्ये मागील आढाव्याच्या तुलनेत सुमारे 7 ते 8 टक्क्यांनी वाढ झाल्याचे निदर्शनास आणून दिले. तथापि, ही वाढ पुरेशी नसल्याचे नमूद करून जिल्हाधिकारी यांनी बँकेने पीक कर्जवाटपाचा वेग आणि प्रमाण वाढविण्याचे निर्देश दिले.
सेवा सहकारी संस्था नवीन पीक कर्जवाटपामध्ये अपेक्षित कामगिरी करणार नाहीत, अशा संस्थांच्या कामकाजाचा सखोल आढावा घेऊन नियमानुसार आवश्यक कार्यवाही करावी. यामध्ये पात्र प्रकरणांमध्ये संस्थेच्या संचालक मंडळाविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्याबाबतही जिल्हाधिकारी यांनी सहायक निबंधकांना निर्देश दिले. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसोबतच जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकांनीदेखील नवीन पीक कर्जवाटपाचे प्रमाण आणि वेग वाढवून पात्र शेतकर्‍यांना वेळेत कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.
कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या सर्व पात्र शेतकरी सभासदांनी संबंधित बँक शाखेशी तातडीने संपर्क साधून नवीन पीक कर्जासाठी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. शेतकर्‍यांना वेळेत पीक कर्ज उपलब्ध झाल्यास आगामी हंगामासाठी शेतीच्या कामांचे नियोजन करणे सुलभ होणार असून, यासाठी प्रशासन, सर्व बँका आणि सेवा सहकारी संस्थांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असेही जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी स्पष्ट केले.

Back to top button