फडणवीसांना संपवण्यासाठी जरांगेंना ताकद देणारे कोण?

प्रवीण दरेकरांचा शिवसेनेला सवाल

मुंबई /23 ऑक्टोबर  :  मनोज जरांगे यांनी समोर आणलेल्या ऑडिओ क्लिपच्या वादात शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी भाजपला खेचले आहे. सदर क्लिप एआय नसून भाजपची आहे, असा दावा त्यांनी केला. तसेच भाजप नेते प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्या नावाचा उल्लेख करत रामदास कदम यांनी चौकशीची मागणी देखील केली. दरम्यान, रामदास कदम यांच्या आरोपावर आता प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे जेव्हा आंदोलन करत होते, तेव्हा आमचं त्यांना समर्थन होतं, आजही समर्थन आहे आणि उद्याही समर्थन राहील. परंतु ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस यांच्यावर व्यक्तिगत टीका व्हायला लागली, तेव्हा आम्ही रिएक्ट झालो. आम्ही काय लपून छपून रिएक्ट नाही झालो. आम्ही असं म्हणायचं की, पडद्याआड राहून जरांगेला ताकद देणारेआणखी कोण होते? त्याचाही शोध यथावकाश होईल. देवेंद्र फडणवीस यांच्या अंगावर सोडायला, देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करायला, तेव्हा कोण कोण होतं? कोणी कोणी काय केलंय? हे सुद्धा पुढे येईल, असा इशारा दरेकर यांनी दिला.
रामदास कदम यांच्या आरोपांवर बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की, एखाद्या जबाबदार ज्येष्ठ नेत्याने अशा प्रकारे आपल्या नेतृत्वाला खुश करण्यासाठी आणि आपल्या मुलाच मंत्रिपद सुरक्षित ठेवण्यासाठी किंवा आणखी प्रमोशन मिळवण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी बोलावं आमची काही हरकत नाही. पण भारतीय जनता पार्टीला दोष देणार असाल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. तुम्ही जसे आक्रमक बोलतात, तसे आम्हालाही वागता येतं आणि आम्हालाही बोलता येतं, असा इशारा दरेकर यांनी दिला.
रामदास कदम यांनी भाजपच्या तीन नेत्यांची नाव घेतली आहेत. आज त्यांनी पुन्हा एकदा थेट भाजपमधील कुठल्या नेत्याने एकनाथ शिंदेना संपवण्याचा विडा उचललाय, असा प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नावर प्रवीण दरेकर म्हणाले की, त्यांनी बेधडकपणे सांगाव, आमच्या कुठल्या भाजपच्या नेत्याने विडा उचललाय. आपण सांगत आहात की, मराठा समाजाच्या नेत्याला संपवण्याचा षडयंत्र भाजपला हाताशी धरून करत आहात. मग आम्ही बोलायचं का, देवेंद्र फडणवीस यांना संपवण्यासाठी जरांगेना कोण कोण ताकद देत होतं? असा प्रश्न दरेकर यांनी उपस्थित केला.

Back to top button