282 अग्निवीरांची पोलीस दलात नियुक्ती

मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय

मुंबई /23 ऑक्टोबर  : देशाच्या सीमेवर लढणार्‍या अग्निवीरांना सरकारी नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळानं घेतला होता. त्यानुसार, नियमात आवश्यक बदल करून 282 अग्निवीरांना नियुक्ती देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या पोलीस दलात शिपाई म्हणून त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे. तसे आदेश संबंधित विभागाला देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
केंद्र सरकारकडून महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या 282 नौदल अग्निवीरांची पहिली यादी राज्य सरकारला देण्यात आली होती. त्यानुसार, 150 खलाशी डेकसाईड आणि 132 खलाशी इंजिनसाईड अशा 282 अग्निवीरांना पोलिस शिपाई म्हणून नियुक्ती देण्यात आलीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस शिपाई म्हणून नियुक्त झालेल्या अग्निवीरांना शुभेच्छाही दिल्या.
याबाबत फडणवीस म्हणाले की, राज्य सरकारने हा निर्णय घेतला होता. महाराष्ट्रातील अग्निवीर आपला कार्यकाळ संपवून परत येतील, तेव्हा अग्निवीरांना महाराष्ट्र पोलीस दलात नोकरी करण्याची इच्छा असेल, तर आम्ही त्यांना सामावून घेऊ. या जवानांनी सीमेवरसुद्धा काम केले आहे. प्रचंड क्षमता त्यांच्यामध्ये आहे. पहिल्यांदा नौदलाची बॅच आलेली आहे आणि त्यांना पोस्टल पोलीसमध्ये आम्ही घेतले आहे. पोस्टल पोलीसमध्ये सातत्याने कॅपॅसिटी बिल्डिंग तयार करणे गरजेचे होते. अडीचशे पेक्षा जास्त अग्निवीर पोस्टल पोलीसमध्ये आल्यामुळे सागरी सुरक्षा करण्याकरिता अत्यंत प्रशिक्षित मनुष्यबळ आम्हाला मिळाला आहे. नियमांमध्ये काही बदल करायचा असेल, तर बदल करून सर्वांना सामावून घेतले आहे. सरळ भरती होती. चाचणीची आवश्यकता नव्हती. चाचणी करून, शारीरिक चाचणीनंतर ते सैन्यात गेलेले आहेत.

Back to top button