‘त्या’ ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक चौकशी करणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकेत

अडीच वर्षांनंतर क्लिप बाहेर येण्यामागचा हेतू काय?
नागपूर /23 ऑक्टोबर : 500 कोटी रुपयांच्या आरोपांवरून मनोज जरांगे यांनी ऐकविलेल्या ऑडियो क्लिपसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात भाष्य केले. या क्लिपची फॉरेन्सिक चौकशी करण्यात येईल. परंतु अडीच वर्षांनंतर हे संभाषण बाहेर येण्यामागचा नेमका हेतू काय, तसेच यातून कुणाला लक्ष्य केले जात आहे? असे प्रश्न उपस्थित होत असून फॉरेन्सिक चौकशीतून सत्य समोर येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. नागपुरात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदान केल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
शिंदेसेनेचे प्रतिनिधी मला गुरुवारी भेटले होते. त्यांना या प्रकरणाच्या चौकशीचे आश्वासन दिले आहे. भारतीय जनता पक्ष, शिंदेसेना आणि मनोज जरांगे यांनीही या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे समोर आलेली क्लिप आणि त्यातील संभाषणाची फॉरेन्सिक तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीच्या नेत्या व खा. सुप्रिया सुळे यांनी मतदानाबाबत स्पायपेनचा वापर होत असल्याचा आरोप केला आहे. याबाबत विचारणा केली असता स्पायपेन म्हणजे नेमके काय? हे सुप्रिया सुळे यांनी मला सांगावे. तो पेन नेमका कसा असतो, हे मी समजून घेईन, असे फडणवीस म्हणाले.





