महाराष्ट्रातील अवैध स्त्रीबीज रॅकेटसंदर्भात कारवाई

ईडीचे ठाणे, नाशिकसह 10 ठिकाणी छापे

मुंबई /22 ऑक्टोबर – गरीब महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांची मानवी स्त्रीबीज काढण्यास प्रवृत्त करणार्‍या एका अवैध रॅकेटविरोधात ईडीने मोठी कारवाई केली. ईडीच्या मुंबई युनिटने मनी लाँडरिंग विरोधी कायद्यांतर्गत ठाणे, बारामती आणि नाशिकमधील रुग्णालये आणि आयव्हीएफ केंद्रांसह 10 ठिकाणी छापे टाकले. या छाप्यांदरम्यान तपास यंत्रणेने 29 लाख रुपये रोख जप्त केले आणि बँक लॉकर तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूकही गोठवली. या छाप्यांदरम्यान अनेक गुन्हेगारी कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणेही जप्त करण्यात आली असून त्यांची तपासणी सुरू आहे.
बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआर आणि आरोपपत्राच्या आधारे ईडीने हा तपास सुरू केला होता. या प्रकरणात, मंजुषा वानखेडे यांच्यासह 16 जणांविरुद्ध फसवणूक, बनावटगिरी आणि सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान (एआरटी) कायदा व औषध आणि सौंदर्यप्रसाधने कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात असे उघड झाले की, हे संपूर्ण रॅकेट एका संघटित नेटवर्कद्वारे चालवले जात होते. एजंट आर्थिक अडचणीत असलेल्या गरीब महिलांना पैशांचे आमिष दाखवून स्त्रीबीज दान करण्यास प्रवृत्त करत. त्यानंतर त्यांना विविध आयव्हीएफ केंद्रे आणि एआरटी बँकांमध्ये घेऊन जात. असा आरोप की, आयव्हीएफ केंद्रे एजंटमार्फत महिलांना पैसे देत असत आणि या नेटवर्कमधील मध्यस्थांनाही मोठी दलाली मिळत होती.

Back to top button