विनयभंग प्रकरणात आरोपीला 2 वर्षेे सश्रम कारावासाची शिक्षा
दहीहंडा पोलीस स्टेशन हद्दीतील घटना, 9 हजार रुपये दंडही ठोठावला

अकोला/22 ऑक्टोबर – अकोट तालुक्यातील गोपालखेड येथील आरोपी शेषराव साहेबराव मोडक वय 49 वर्ष याला 21 ऑक्टोंबर रोजी अकोट येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी खटला क्रमांक 254/2023 या प्रकरणात त्यांच्याविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने आरोपीला कलम 354 भादवी. मध्ये दोषी ठरवून 2 वर्ष शिक्षा व 5,000/- रु. द्रव्यदंडाची शिक्षा, कलम 354(अ )भादवी. मध्ये दोषी ठरवून 2 वर्ष शिक्षा व 1,000/-रु. द्रव्यदंडाची शिक्षा, कलम 452 भादवी. मध्ये दोषी ठरवून 2 वर्ष शिक्षा व 3,000/- रु. द्रव्यदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सदर प्रकरणाची थोडक्यात हाकिकत अशी आहे की, यातील आरोपी शेषराव साहेबराव मोडक रा. गोपालखेड ता. अकोट, जि. अकोला हा दिनांक 10/8/2023 रोजी सकाळी फिर्यादीचे घरी कोणी नसताना व तिचे पती हे कामाकरिता बाहेरगावी गेले असतांना व सासू सासरे हे सुद्धा शेतीच्या कामाला गेले असतांना फिर्यादी ही 10.30 वा. मोठ्या मुलाला अंगणवाडीत सोडून देण्यासाठी व लहान मुलाला कडेवर घेऊन गेली असता त्यावेळी शेषराव मोडक हा बाबाराव मोडक घराजवळ फिर्यादीस उभा दिसला. मोठ्या मुलाला अंगणवाडी सोडून दिल्यानंतर फिर्यादी ही घरी आले व आरोपीने फिर्यादीचा विनयभंग केला त्यावेळी फिर्यादीने त्याला दूर लोटले व घरून निघून जाण्यास सांगितले व ओरडाओरड केली. त्यानंतर आरोपी हा घरातून पळून गेला व फिर्यादीने लगेच तिचे पती यांना फोनवर झालेली हकीकत सांगितली. असा फिर्यादीच्या जबानी रिपोर्ट वरून दहीहंडा पोलीस स्टेशन येथे अपराध क्र. 281/2023 कलम 354, 354(अ ), 354(ड ),452, 323 भादवी. अन्वये गुन्हा दाखल करून तपासात घेतला असता तपास अधिकारी मपोउपनि शिल्पा धुर्वे यांनी सदर गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. सदर प्रकरणात अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी, अकोट विभाग नितीन पाटील, दहीहंडा पोलीस स्टेशन सपोनि यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी पोहेकॉ महेंद्र काळे, दहीहंडा पोलीस स्टेशन यांनी पाठपुरावा केला.





