कमी व्होल्टेजमुळे शेतकरी संकटात
सोनोरा बु. येथील शेतकर्यांचा महावितरणला इशारा

समस्या न सुटल्यास उपोषणाचा निर्धार
चांदूर रेल्वे/21 ऑक्टोबर : एकीकडे दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत असताना, दुसरीकडे शेतशिवारातील कमी दाबाचा वीजपुरवठा आणि वारंवार खंडित होणार्या विजेमुळे शेतकर्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. सोनोरा बु. येथील शेतशिवारात लो-व्होल्टेजच्या समस्येमुळे शेतीपंप सुरू होत नसल्याने पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे. या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा उपोषणाला बसण्याचा इशारा माजी सरपंच सुरज शा. मेश्राम यांच्यासह शेतकर्यांनी महावितरण प्रशासनाला दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोनोरा बु. परिसरातील शेतशिवारात अत्यंत कमी दाबाने वीजपुरवठा होत असून, दिवसातून अनेकदा वीज खंडित होत असल्याची तक्रार शेतकर्यांनी केली आहे. कमी दाबामुळे शेतीपंप सुरू होत नसल्याने पिकांना वेळेवर पाणी देणे शक्य होत नाही. पंप सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास मोटारी जळण्याचाही धोका निर्माण होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. सध्या पिकांना पाण्याची नितांत गरज असताना वीजपुरवठ्याच्या या समस्येमुळे पिके सुकण्याची भीती व्यक्त होत आहे.
‘शेती करायची कशी आणि पिके वाचवायची तरी कशी?’ असा प्रश्न शेतकर्यांसमोर उभा ठाकला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या बळीराजाला आता वीजपुरवठ्याच्या समस्येचाही सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकर्यांमध्ये महावितरणच्या कारभाराविषयी नाराजी वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर माजी सरपंच सुरज शा. मेश्राम यांनी शेतकर्यांच्या वतीने महावितरणच्या चांदूर रेल्वे ग्रामीण विभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. परिसरातील वीजदाबाची तपासणी करून वीजपुरवठा सुरळीत करावा, आवश्यकतेनुसार नवीन किंवा अधिक क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर (डीपी) बसवावा आणि शेतीसाठी निर्धारित वेळेत पूर्ण दाबाने वीज उपलब्ध करून द्यावी, अशा प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.





