अर्भक विक्री प्रकरणात भोजने रुग्णालय सील
पोलिसांनी कुलूप फोडून केला रुग्णालयात प्रवेश

कागदपत्रे, अन्य पुरावे जप्त
अमरावती /21 ऑक्टोबर : एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीची प्रसूती करून तिच्या नवजात बाळाच्या कथित विक्रीचा सौदा केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने बुधवार, 21 ऑक्टोबर रोजी महापालिका आरोग्य विभागाच्या पथकाने राजापेठस्थित बुटी प्लॉट परिसरातील डॉ. भोजने मॅटर्निटी अँड नर्सिंग होम या रुग्णालयाला सील ठोकले. सोबतच, महाराष्ट्र मुंबई नर्सिंग होम रजिस्ट्रेशन क्ट 1949 चे प्रमाणपत्र आणि डॉ. वैशाली भोजने यांच्या नावे असलेले एमटीपी क्ट 1971 चे रजिस्ट्रेशन तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे अमरावतीच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान 18 ऑक्टोबर रोजी पहाटे 5 वाजता गुन्हा दाखल होताच डॉ. भोजने व त्यांचे राजकीय पदाधिकारी असलेले पती फरार झाले आहेत. ते अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.
सोबतच, सोनोग्राफी व एमटीपी सेंटरदेखील सीलबंद करण्यात आले. महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे यांच्या नेतृत्वाखाली हे पथक बुधवारी दुपारी 12 च्या सुमारास फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याचे ठाणेदार रवींद्र राजुलवार आणि तपास अधिकारी एपीआय निरंजना उमाळे यांच्यासह डॉ. भोजने यांच्या रुग्णालयात पोहोचले होते.
आरोपी डॉक्टर व त्यांचे पती फरार असल्याने आणि रुग्णालयाला कुलूप असल्यामुळे, प्रशासनाला कुलूप तोडून आत प्रवेश करावा लागला. सुमारे चार तास चाललेल्या या कारवाईत रुग्णालयातील कागदपत्रे, अन्य पुरावे जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे, 2017 मध्येही याच नर्सिंग होमवर एमटीपी संदर्भात कारवाई झाल्याची माहिती डॉ. काळे यांनी दिली आहे. या प्रकरणी, 17 वर्षीय पीडित मुलगी सर्वप्रथम डॉ. मयूर दांडगे (32, रा. प्रशांत नगर) यांच्याकडे गेली होती; परंतु दांडगे यांनी ही संवेदनशील माहिती पोलिसांना न देता तिला थेट डॉ. वैशाली भोजने यांच्याकडे पाठवले होते. तिथे पीडितेची प्रसूती करून तिच्या नवजात बाळाची बेकायदेशीररीत्या विक्री करण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला.
याप्रकरणी 18 ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास डॉ. वैशाली भोजने, त्यांचे पती आणि एका अल्पवयीन मुलावर अत्याचार व मानवी तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर 19 ऑक्टोबर रोजी रात्री 11.12 वाजता डॉ. मयूर दांडगे (32) यांना पोलिसांनी अटक केली. पोलिस कोठडीदेखील घेण्यात आली.





