सख्ख्या भावाच्या साखरपुड्याचा राग मनात धरून चाकूहल्ला
दर्शनासाठी निघालेल्या जोडप्यांवर प्राणघातक हल्ला

राजापेठ पोलिसांची तत्परता; दोघे आरोपी जेरबंद
अमरावती /21 ऑक्टोबर – दसर्याच्या रात्री देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या तरुण-तरुणीवर राजापेठ परिसरातील कुळकर्णी रुग्णालयाजवळ चाकूने सपासप वार करण्यात आल्याची घटना घडली. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सख्ख्या मोठ्या भावाच्या साखरपुड्याला विरोध असल्याच्या रागातून लहान भावाने आपल्या साथीदाराच्या मदतीने हा हल्ला केल्याचे तपासात समोर आले. घटनेनंतर राजापेठ पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तत्पर कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, मयूर जामोदकर (वय 28, रा. छत्रसाल नगर) हा आपल्या मैत्रिणीसोबत देवीच्या दर्शनासाठी जात होता. कुळकर्णी रुग्णालयाजवळ दुचाकीवरून आलेल्या 2 तरुणांनी त्यांच्यावर अचानक चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. तरुणीची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळाजवळ दुर्गा मंडळे असज्ञल्याने दसर्यानिमित्त नागरिकांची मोठी गर्दी होती. घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. हल्ल्यामागे नातेसंबंधातील वाद असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानुसार तपासाची चक्रे फिरवून मयूरचा भाऊ धीरज गोविंद जामोदकर (वय 23) आणि त्याचा साथीदार शोएबुद्दीन सिराजुद्दीन शेख (वय 32) यांना अटक करण्यात आली. मोठ्या भावाच्या साखरपुड्यावरून नाराज असलेल्या धीरजने हा हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू होती.





