विद्यापीठात विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीबाबत संवाद बैठक
शासनाच्या तज्ञ समितीने जाणून घेतली विविध घटकांची मते

अमरावती/18 ऑक्टोबर : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात विद्यार्थी परिषदेच्या आगामी निवडणुका एकदम निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने घेण्यासाठी एक महत्त्वाची संवाद व सर्वेक्षण बैठक पार पडली. या बैठकीत निवडणुकीची पद्धत, प्रचार आणि मतदान यावर सविस्तर चर्चा करण्यात आली असून, सर्व घटकांच्या मतांचा विचार करून राज्य शासनाला अहवाल दिला जाणार आहे. विद्यापीठ व महाविद्यालयीन विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका कशा घ्याव्यात याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी विद्यापीठाच्या पंजाबराव देशमुख अधिसभा सभागृहात ही बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, राज्य शासनाच्या तज्ज्ञ समितीचे सदस्य डॉ. अविनाश मोहरील, प्रा. डॉ. प्रशांत साठे आणि विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजीव बोरकर उपस्थित होते.महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 नुसार विद्यापीठे, महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थांमध्ये विद्यार्थी परिषदेची स्थापना करण्याची तरतूद आहे. यानुसार राज्य शासनाने 24 सप्टेंबर 2026 रोजी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तज्ज्ञ समितीची स्थापना केली आहे. या बैठकीत समितीचे सदस्य डॉ. अविनाश मोहरील आणि प्रा. डॉ. प्रशांत साठे यांनी उपस्थित विद्यार्थी, प्राध्यापक आणि प्राचार्यांची मते जाणून घेतली. मागील निवडणुकांच्या अनुभवातून शिकत यंदाच्या निवडणुकीत काय बदल करता येतील, यावर सविस्तर चर्चा झाली. सर्व घटकांच्या सूचना एकत्र करून समितीकडून शासनाला अहवाल सादर केला जाईल, असे प्रा. डॉ. प्रशांत साठे यांनी स्पष्ट केले.विद्यार्थ्यांनी शासनाने जारी केलेल्या परिपत्रकाचा अभ्यास करावा, असे आवाहन प्रा. डॉ. प्रशांत साठे यांनी केले. प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, विद्यापीठ कायद्यानुसार विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेल्या अधिकृत डॉक्युमेंटमध्ये आजच्या सर्व सूचनांचा नक्कीच समावेश केला जाईल. या चर्चेमुळे भविष्यात विद्यापीठातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेता येईल आणि विद्यार्थ्यांमधून एक सक्षम व कणखर नेतृत्व तयार होण्यास मोठी मदत होईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने करण्यात आले होते, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संचालक डॉ. राजीव बोरकर यांनी केले. या बैठकीला राज्यपाल नामनियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रव्यू कडूसकर, डॉ. राजेश जयपुरकर, डॉ. व्ही. एम. मेटकर, डॉ.संदीप वाघमारे, डॉ. निलय कडूसकर, नवोपक्रम, प्रा. स्वाती शेरेकर, प्राचार्य डॉ. दीपक धोटे, डॉ. जागृती बारब्दे , कैलाश चव्हाण, अमोल देशमुख तसेच विविध महाविद्यालयाचे प्राचार्य , प्राध्यापक , प्राधिकारिणी सदस्य , आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





