चाकूच्या धाकावर डिलिव्हरी बॉयला लुटले
तिघांना अटक, दोन विधीसंघर्षित बालक

अमरावती / 30 जून: चाकूचा धाक दाखवून एका कुरियर कंपनीच्या डिलिवर बॉयजवळील बारा पार्सल व रोख रक्कम असा 19 हजार 597 रुपयांचा मुद्द्माल लुटणार्या तीन आरोपींना फ्रेजरपूरा पोलिसांनी घटनेनंतर 24 तासांच्या आत अटक केली आहे. आरोपींमध्ये दोन विधी संघर्षित बालकांचा समावेश आहे. या जबरी चोरी प्रकरणातील काही मुद्देमाल पोलिसांनी आरोपींकडून हस्तगत केला आहे.
प्राप्त माहितीनुसार सागर रामसिंग पठ्ठे (40, औरंगपूरा, अंबागेट) याने यासंदर्भात फ्रेजरपूरा पोलिस ठाण्यात शनिवारी तक्रार दाखल केली होती. सागर पठ्ठे हा राजकमल चौकात असलेल्या एक्सप्रेस बीज कुरियर कंपनीत पार्सल डिलिव्हरीचे काम करतो. नेहमीप्रमाणे 27 जून रोजी एक पार्सल पोहोचविण्यासाठी सागर महादेव खोरी परिसरातील बागडे ले-आउट येथे गेला होता. त्याने संबंधित इसमास पार्सल घेण्यासाठी या भागातील महादेव मंदिराकडे जाणार्या रस्त्यावर बोलाविले होते. काही वेळाने विना क्रमांकाच्या दुचाकीवरुन तीन मुले त्याच्याजवळ आली आणि पैस न देता पार्सल हिसकावून तेथून पसार झाली.
सागरने याच परिसरात त्या तीन मुलांचा शोध घेतला तेव्हा ते तिघे आणि त्यांचा आणखी एक साथीदार एका ले-आउटमध्ये त्याला दिसले. सागर त्यांच्याजवळ जाताच त्यांनी सागरला चाकूचा धाक दाखवून मारहाण केली. यावेळी या मुलांनी सागर जवळचे वेगवेगळ्या कंपनीचे 12 पार्सल आणि 7 हजार 395 रुपये रोख असा 19 हजार 597 रुपयांचा मुद्देमाल हिसकावून घेतला आणि तेथून पळ काढला. सागर पठ्ठे याने तात्काळ फ्रेजरपूरा पोलिस ठाण्यात जावून तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तात्काळ तपासाला सुरुवात केली.
दरम्यान या घटनेत याप्रकरणात श्रीकांत उर्फ तेजस उर्फ तेजा भुजबळ (20, रा. पाटील किराणा जवळ, महादेव खोरी, अमरावती) याचा हात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेतले. श्रीकांतची कसून चौकशी केली असता आपल्या तीन साथीदारांसह डिलिव्हरी बॉय सागर पठ्ठे याला लुटल्याचे कबुल केले. त्यांची नावेही श्रीकांतने पोलिसांना सांगितली. त्यापैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र हे दोन्ही मुले अल्पवयीन असल्याने तयांना बाल न्याय मंडळासमोर हजर करुन बाल निरिक्षण गृहात पाठविण्यात आले.
आरोपींकडून पोलिसांनी चोरी गेलेल्या 12 पैकी सहा पार्सल ज्याची किंमत 5 हजार रुपये आहे, हस्तगत केले आहेत. ही कारवाई फ्रेजरपूरा पोलिस ठाण्याचे वरिष् पोलिस निरिक्षक रोशन शिरसाट, पोलिस निरिक्षक निलेश गावंडे, डीबी पथक प्रमुख पोलिस उपनिरिक्षक राहुल महाजन, हेकॉ सुभाष पाटील, सचिन बोरकर, शशिकांत गवई, जावेद पटेल, प्रशांत वानखउे, सागर चव्हाण, उमेश चुलपार यांनी केली.




