शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित

शालेय शिक्षण विभागाचा निर्णय जारी

टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई/15 ऑक्टोबर   : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय अधिकृतपणे निश्चित केले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 मधील तरतुदींनुसार हा निर्णय घेण्यात आला असून, हे वय 30 जून रोजी पूर्ण असणे आवश्यक आहे. नवीन निकष शैक्षणिक वर्ष 2027-28 पासून टप्प्याटप्प्याने लागू केले जाणार असून, यासंदर्भातील शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने जारी केला आहे.
नवीन निर्णयानुसार बालवाटिका-1 (नर्सरी) प्रवेशासाठी तीन वर्षे पूर्ण असण्याचा निकष 2027-28 पासून लागू होईल. त्यानंतर बालवाटिका-2 (ज्युनिअर के.जी.) साठी चार वर्षे (2028-29), बालवाटिका-3 (सिनिअर के.जी.) साठी पाच वर्षे (2029-30), तर इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी सहा वर्षे पूर्ण असण्याचा निकष शैक्षणिक वर्ष 2030-31 पासून लागू करण्यातयेणार आहे.राज्यात यापूर्वी राज्य मंडळासह सीबीएसई, आयसीएसई आणि आयबी शाळांमध्ये पहिलीच्या प्रवेशासाठी वेगवेगळ्या दिनांकांनुसार वयोमर्यादा ग्राह्य धरली जात होती आणि पूर्व-प्राथमिक प्रवेशासाठी कोणतीही निश्चित वयाची अट नव्हती. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर आता सर्व शाळांसाठी एकसमान वयाचे निकष स्पष्ट करण्यात आले आहेत.
शैक्षणिक वर्ष 2026-27 मधील नर्सरी ते इयत्ता पहिलीच्या विद्यमान विद्यार्थ्यांना हे नवीन वयाचे निकष लागू होणार नाहीत. तसेच, कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेतून मागील वर्ग उत्तीर्ण झालेल्या नियमित विद्यार्थ्यांना पुढील उच्च वर्गात प्रवेश देताना वयाचे निकष लागू करण्यापासून सूट देण्यात आली आहे. याशिवाय, शाळाप्रमुख स्तरावर किमान व कमाल वयोमर्यादेत 15 दिवसांची विशेष सूट देण्याचे अधिकार राहतील.

Back to top button