संतप्त शेतकर्याने पाठवली मुख्यमंत्र्यांना 5 हजारांची मनीऑर्डर
दीड एकर सोयाबीनसाठी 25 हजारांचा खर्च

धाराशिव/15 ऑक्टोबर : राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकर्यांना जाहीर केलेल्या पाच हजार रुपयांच्या आग्रीम मदतीवर सर्वस्तरातून टीका होत असतानाच सुर्डी (ता. धाराशिव) येथील एका शेतकर्याने मदतीवर नाराजी व्यक्त करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाच हजार रुपयांची मनीऑर्डर पाठवली आहे. दीड एकर सोयाबीनच्या पिकासाठी तब्बल 25 हजार रुपये खर्च करूनही हातात अवघे 3 हजार 900 रुपये आल्याने शेतकर्याने हे पाऊल उचलले आहे.
सुर्डी येथील चांद पैगंबर शेख, या शेतकर्याने दीड एकर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली होती. मशागत, पेरणी, बियाणे, खते, औषधांची फवारणी आणि काढणी, अशा विविध कामांसाठी सुमारे 25 हजार रुपये खर्च झाला होता. मात्र, प्रतिकूल परिस्थितीमुळे या क्षेत्रातून अवघे 60 किलो सोयाबीनचे उत्पादन मिळाले आहे. सोयाबीनची विक्री केल्यानंतर शेतकर्याच्या हातात केवळ 3 हजार 900 रुपये आले. शेतकर्याचा खर्चही निघाला नाही. अशा स्थितीत सरकारने पाच हजार रुपयांची मदत जाहीर केल्याचे समोर आल्यानंतर संतप्त शेतकर्याने उर्वरित 1,100 रुपये उसने घेऊन मुख्यमंत्र्यांना मनीऑर्डर केली आहे.
दीड एकर सोयाबीनसाठी 25 हजार रुपयांचा खर्च करूनही उत्पन्न अवघे 3 हजार 900 रुपये मिळत असतील, तर शेतकर्यांचे नुकसान भरून निघणार कसे, असा प्रश्न या घटनेतून उपस्थित होत आहे. दुष्काळी परिस्थिती, घटलेले उत्पादन आणि वाढता शेती खर्च यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत पाच हजार रुपयांच्या अग्रीम मदतीवर समाधान मानायचे कसे, असा सवाल सुर्डीतील शेतकर्याने उपस्थित केला आहे.





