सौरभ कटियार यांची एमपीएससीच्या सचिवपदी नियुक्ती
पुण्यातील आंदोलनानंतर निर्णय

पुणे /14 ऑक्टोबर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विविध मागण्यांसाठी पुण्यामध्ये विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या तीव्र आंदोलनावर मार्ग काढत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटी प्रकरणात अध्यक्ष विवेक भीमनवार यांना तूर्त रजेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर भीमनवार यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत रजेवर जाण्याचा निर्णय जाहीर केला. यानंतर आता राज्य लोकसेवा आयोगाच्या सचिवदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे देण्यात आला आहे. महेंद्र हरपाळकर यांच्या बदलीनंतर कटियार यांच्याकडे सचिवपदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात हरपाळकर यांच्या बदलीची विद्यार्थ्यांनी मागणी केली होती. काही दिवसांपूर्वीच महेंद्र हरपाळकर यांची सचिवपदावरून बदली करण्यात आली होती. आता हरपाळकर यांच्या जागीकटियार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.दरम्यान, लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटी प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारने न्या. दिलीप भोसले यांची समिती गठीत केली असून त्यांना चौकशीसाठी दोन महिन्यांची मुदत दिली आहे. न्यायालयीन चौकशी समितीच्या स्थापनेची सरकारने घोषणा केली असून त्याबाबतचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठविण्यात आला आहे. राज्यपालांच्या मान्यतेनंतर चौकशी समितीची अधिसूचना निर्गमित होणार असून त्यानंतर समितीचे कामकाज सुरू होईल.





