राहुल गांधींनी 2029 च्या पराभवासाठी तयार राहावे
एसआयआरच्या नावाखाली घुसखोरांना संरक्षण देतायेत

अमित शाह यांचा हल्लाबोल
नवी दिल्ली/13 ऑक्टोबर : ‘इंडिया’ आघाडीच्या ‘चलो दिल्ली’ मोर्चाच्या पार्श्वभूमीवर, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या निवासस्थानी दुपारी 4 वाजता विरोधी पक्षांचे खासदार, विद्यार्थी संघटना आणि नागरी समाजातील सदस्यांना चाय पे चर्चा करण्यासाठी आमंत्रित केले होते. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सर्व विरोधी नेत्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. मात्र आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.
गुजरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपच्या विजयानंतर अमित शहा यांनी काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. अमित शहा म्हणाले की, आम आदमी पक्षाने 32 जागांवर निवडणूक लढवली आणि त्या सर्व जागांवर त्यांची अनामत रक्कम जप्त झाली. कारण गुजरातचे मतदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. तसेच गांधीनगर महानगरपालिकेत भाजपच्या मतांच्या टक्केवारीत 10 टक्क्यांनी वाढ झाली. मात्र काँग्रेसने गुजरातमध्ये शेवटचा विजय 1985 मध्येमिळवला होता आणि 41 वर्षे उलटूनही देखील त्यांना तिथे विजय मिळवता आलेला नाही. या पराभवाचे कारणही ‘एसआयआर’ मानले जाईल का? असा प्रश्न शहा यांनी राहुल गांधींना विचारला. तसेच पंतप्रधान मोदींच्या विजयाला ‘एसआयआर’शी जोडण्यापेक्षा काँग्रेसने स्वतःच्या पराभवाची कारणे शोधावीत आणि त्यावर चिंतन करावे, असा सल्ला शहा यांनी दिला.तमिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पुद्दुचेरी येथे झालेल्या पोटनिवडणुकांचा संदर्भ देत अमित शहा म्हणाले की, काँग्रेसला याठिकाणी एकही जागा जिंकता आलेली नाही. याउलट आसाममधील नागाव येथे भाजपने काँग्रेसकडून एक जागा हिसकावून घेतली. पश्चिम बंगालमधील नंदीग्राममध्ये भाजप उमेदवाराचा विजय आणि रेजीनगरमध्ये तृणमूल काँग्रेसकडून एक जागा जिंकण्यात आमच्या पक्षाला यश मिळाले. पुद्दुचेरीमधील एनडीएचा विजय काँग्रेससाठी आत्मपरीक्षण करण्याचे संकेत आहेत. तसेच राजस्थानमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपने महानगरपालिकांच्या 90 टक्के, नगरपालिकांच्या 66 टक्के आणि नगरपंचायतींच्या 65 टक्के जागा जिंकल्या. त्रिपुरातील ग्रामसमिती निवडणुकांमध्ये एनडीएने एकूण 4,600 जागांपैकी 4,000 जागा जिंकल्या. त्रिपुरातील या निवडणुका मतपेट्यांचा वापर करून घेण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे काँग्रेस त्रिपुरामध्ये 30 वर्षांपासून आणि पश्चिम बंगालमध्ये 56 वर्षांपासून विजय मिळवलेला नाही, ही बाब शहा यांनी निदर्शनास आणून दिली.





