बंडखोरी रोखण्यासाठी 16 ला महायुतीची बैठक

अमरावती/13ऑक्टोबर – अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांचा विजय नक्की असून बंडखोरी रोखण्यासाठी 16 ऑक्टोबर रोजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक आणि महायुतीचा भव्य मेळावा पार पडणार आहे; तसेच खा. डॉ. अनिल बोंडे महायुतीसोबत राहून सरनाईक यांना पहिल्या पसंतीचे मतदान मिळवून देतील, असा ठाम विश्वास मंत्री उदय सामंत आणि आ. बच्चू कडू यांनी अमरावतीत व्यक्त केला.
अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार किरण सरनाईक यांच्या प्रचाराची रणनीती आखण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरण्यासाठी राज्य सरकारचे मंत्री उदय सामंत अमरावती दौर्‍यावर आले होते. येथील ग्रँड महफील हॉटेलमध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रमुख नेतेमंडळींची खलबते पार पडली. या महत्त्वपूर्ण बैठकीला मंत्री नीतेश राणे, विदर्भातील धडाडीचे नेते आ. बच्चू कडू यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी हजर होते. त्यामुळे अमरावतीच्या या जागेसाठी महायुती किती आक्रमक आणि गंभीर आहे, हे स्पष्ट दिसून आले.
पत्रकारांशी बोलताना उदय सामंत यांनी सांगितले की, किरण सरनाईक यांनी मागील 6 वर्षांत आमदार म्हणून शिक्षकांचे अनेक जिव्हाळ्याचे प्रश्न तडीस नेले आहेत. शिक्षकांनी त्यांचे प्रत्यक्ष काम पाहिले असल्याने जनता पुन्हा त्यांनाच कौल देईल. महायुतीतील अंतर्गत धुसफूस आणि बंडखोरी मोडून काढण्यासाठी 16 ऑक्टोबर रोजी अमरावतीत सर्व पक्षांचा संयुक्त मेळावा आयोजित केला आहे. भाजपमधून रिंगणात उतरलेल्या संगीता शिंदे आणि चंद्रशेखर भोयर यांच्या बंडखोरीवर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली जाईल. महायुतीची सर्व मते अधिकृत उमेदवाराला मिळवून देण्याची संपूर्ण जबाबदारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री संजय राठोड यांनी घेतली आहे. माजी आमदार असो वा विद्यमान आमदार, प्रत्येकाने एकदिलाने काम करावे लागेल. एकनाथ शिंदे यांच्या कामात नाराजी हा शब्दच बसत नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
या बैठकीनंतर आ. बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना खा. डॉ. अनिल बोंडे यांच्या भूमिकेवर स्पष्ट मत मांडले. निवडणुकीच्या आखाड्यात सख्खी बहीण उभी असली, तरी बोंडे हे भाजपचे निष्ठावान नेते आहेत. खासदार असल्याने त्यांच्या खांद्यावर महायुतीची मोठी जबाबदारी आहे. ते पहिल्या पसंतीचे मत महायुतीचे अधिकृत उमेदवार सरनाईक यांनाच मिळवून देतील आणि दुसर्‍या पसंतीसाठी बहिणीचा विचार करू शकतील. निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक क्लृप्त्या लढवल्या जातात, मात्र आमच्या उमेदवाराने सर्व नियम पाळूनच जनतेचा विश्वास जिंकावा, असे कडू यांनी नमूद केले.

किरण सरनाईक यांना विजयी करण्याचा निर्धार
भाजपच्या बंडखोर उमेदवार संगीता शिंदे आणि चंद्रशेखर भोयर यांच्या भूमिकेमुळे निर्माण झालेली डोकेदुखी मिटवण्यासाठी महायुतीने थेट कंबर कसली आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री संजय राठोड यांनी सर्व मतांची जबाबदारी घेतली आहे. 16 ऑक्टोबर रोजी होणार्‍या संयुक्त मेळाव्यात दोन्ही नेत्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून बंडखोरीवर तोडगा काढण्याचा ठाम निश्चय सामंत यांनी बोलून दाखवला.

खा. डॉ. अनिल बोंडे सरनाईक यांच्या पाठीशी
आ. बच्चू कडू यांनी खा. डॉ. अनिल बोंडे यांच्या निष्ठेवर पूर्ण विश्वास व्यक्त केला. निवडणुकीच्या आखाड्यात सख्खी बहीण उभी असली तरी बोंडे महायुतीचा धर्म पाळतील. ते पहिल्या पसंतीचे मत किरण सरनाईक यांनाच मिळवून देतील. खासदार असल्याने त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. निवडणुकीत अनेक प्रकार चालतात, पण आम्ही सर्व नियमांचे भान राखूनच पुढे जाऊ.

Back to top button