व्हेंटीलेटर खरेदीत करोडोंचा भ्रष्टाचार

माजी पालकमंत्री डॅा. सुनिल देशमुख यांचा गौप्यस्फोट

मरावती मेडीकल कॉलेजकडून इर्विन रुग्णालयासाठी खरेदी

13 लाखांच्या यंत्रासाठी 22 लाखांचा खर्च

20 यंत्रांच्या खरेदीत 2 कोटींचा संशय

अमरावती/1 सप्टेंबर– अमरावती वैद्यकीय महाविद्यालयाकडून इर्विन रुग्णालयासाठी खरेदी करण्यात आलेल्या श्वसनयंत्रांच्या दरावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. 13 लाख रुपये किमतीचे श्वसनयंत्र तब्बल 22 लाख 55 हजार रुपयांना खरेदी केल्याचा आरोप माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी केला असून, 20 यंत्रांच्या खरेदीत सुमारे 2 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा संशय व्यक्त केला आहे. या संपूर्ण खरेदीची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित पुरवठादाराचे देयक थांबवावे आणि दोषी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
जिल्हा स्त्री रुग्णालय अर्थात डफरीन येथील नवजात शिशू अतिदक्षता विभागात श्वसनयंत्र फुटल्यानंतर तीन नवजात बालकांच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच ही खरेदी चर्चेत आली आहे. त्यामुळे रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणांची गुणवत्ता आणि खरेदी प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. डॉ. सुनील देशमुख यांच्या म्हणण्यानुसार जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी हॅमिल्टन सी-3 कंपनीची 20 श्वसनयंत्रे खरेदी करण्यात आली. या खरेदीची एकूण किंमत सुमारे साडेचार कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र संबंधित कंपनीच्या अधिकृत पुरवठादाराकडून मिळालेल्या दरपत्रकानुसार एका यंत्राची किंमत करासह सुमारे 13 लाख 12 हजार रुपये असल्याचा दावा करण्यात आला आहे. एकाच यंत्रासाठी सुमारे 10 लाख रुपये अधिक मोजल्याचा आरोप करत डॉ. देशमुख यांनी वीस यंत्रांच्या खरेदीत जवळपास2 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराची शक्यता व्यक्त केली. योग्य दराने खरेदी झाली असती तर याच निधीत सुमारे 40 श्वसनयंत्रे उपलब्ध झाली असती, असा दावाही त्यांनी केला आहे. या यंत्रांची खरेदी वाशिम येथील निर्मल एजन्सीमार्फत करण्यात आल्याच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. मोठ्या शहरातील अधिकृत वितरकाकडून थेट खरेदी करण्याऐवजी वाशिममधील एजन्सीची निवड का करण्यात आली याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. निर्मल एजन्सीच्या दिलेल्या पत्त्यावर संबंधित प्रतिष्ठान आढळले नसून तेथे किराणा आणि मसाल्याचे दुकान दिसल्याचा दावा त्यांनी केला. या दाव्यांची अधिकृत खातरजमा अद्याप झालेली नाही.
दरम्यान नवजात शिशू विभागासाठी प्रस्तावित इतर वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीचीही चौकशी करण्याची मागणी डॉ. देशमुख यांनी केली आहे. रुग्ण निरीक्षण यंत्र, केंद्रीय निरीक्षण प्रणाली, चलत प्रतिमाचित्रण यंत्र आणि डिफिब्रिलेटर यांसह उपकरणांसाठी सुमारे 3 कोटी 27 लाख रुपयांचा ठेका कोल्हापूर येथील महालक्ष्मी डिस्ट्रीब्युटर्स एजन्सीला दिल्याचा दावा त्यांनी केला. या खरेदीतही बाजारभाव आणि सरकारी दरामध्ये मोठा फरक आहे का याची तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली. सरकारी निधीतून होणार्‍या वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीत पारदर्शकता अत्यावश्यक असल्याचे सांगत डॉ. सुनील देशमुख यांनी मुख्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणाची दखल घेऊन दोषी आढळणार्‍या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. रुग्णांच्या जीवाशी थेट संबंध असलेल्या उपकरणांच्या खरेदीत गैरप्रकार झाल्यास त्याचा परिणाम सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.

Back to top button