कारच्या धडकेत दुचाकीस्वार ग्रामसेवकाचा मृत्यु
चांदुर रेल्वे मार्गावर अपघात

अमरावती / 26 जून: भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला समोरुन धडक दिल्याने घडलेल्या अपघातात ग्रामसेवक असलेल्या इसमाचा मृत्यु झाला. हा अपघात अमरावती-चांदुर रेल्वे मार्गावर पोहरा गावानजीक असलेल्या वाघामाता मंदिराजवळ घडला. वैभव सुधाकर डोंगरे असे मृतक ग्रामसेवकाचे नाव आहे. ते कठोरा मार्गावरील स्वावलंबी नगरातील रहिवासी होते.
वैभव डोंगरे हे यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. बुधवारी सायंकाळी वैभव डोंगरे आपल्या युनिकॉन दुचाकी क्रमांक एमएच 27 / डीएस 2149 ने चांदुर रेल्वेकडे जात असताना पोहरा गावापासून काही अंतरावर असलेल्या वाघामाता मंदिराजवळ विरुद्ध दिशेनं भरधाव वेगात आलेल्या ईको सिल्वर रंगाच्या एमएच 27 / एसी 7792 क्रमांकाच्या चार चाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला समोरुन जोरदार धडक दिली. त्यात वैभव डोंगरे गंभीररीत्या जखमी झाले. वैभव डोंगरे यांना तात्काळ अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणात फ्रेजरपूरा पोलिसांनी भरधाव वेगात व निष्काळजीपणे वाहन चालवून अपघातास व वैभव डोंगरे यांच्या मृत्युस कारणीभूत ठरल्याबद्दल आरोपी वाहन चालकावर गुन्हा नोंदिविला आहे.




