महिलेची रस्त्यावरच प्रसूती
शासकीय नर्सने मदत नाकारल्याचा आरोप

बुलडाणा/25 ऑगस्ट– महाराष्ट्रातील आरोग्य विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. रस्त्यावरच एका गरोदर महिलेची प्रसूती झाली. हाकेच्या अंतरावर रुग्णालय असताना देखील या महिलेला मदत करायला कुणी तयार नव्हते. ग्रामीण रुग्णालयातील स्टाफने तिला मदत करण्यास नकार दिल्याचा आरोप केला जात आहे. शेवटी खासगी नर्सच्या मदतीने रस्त्यावरच महिलेची प्रसूती करण्यात आली. मेहकर ग्रामीण रुग्णालयापासून अवघ्या 50 ते 100 मीटर अंतरावर एका महिलेची रस्त्यावरच प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना आज मेहकर शहरात घडली. प्रसूतीच्या वेदनांनी महिला तडफडत असताना ग्रामीण रुग्णालयातील स्टाफ नर्सने घटनास्थळी येण्यास नकार दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. महिलेची गंभीर अवस्था पाहून योगेश सौभागे यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेत मदतीची विनंती केली. मात्र, डॉक्टर उपलब्ध नसल्याचे सांगत स्टाफ नर्सने बाहेर येण्यास नकार दिल्याचे सौभागे यांनी सांगितले. अखेर खासगी रुग्णालयातील नर्सच्या मदतीने रस्त्यावरच महिलेची प्रसूती करण्यात आली. त्यानंतर महिला आणि बाळाला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकारामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. आपत्कालीन परिस्थितीत शासकीय आरोग्य यंत्रणेची भूमिका आणि ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या उपस्थितीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. महिलेला प्रसुती वेदना होत होत्या. वेदना तीव्र झाल्यामुळे ती मदत मागण्यासाठी घराबाहेर आली. त्यावेळी ती ओट्यावर पडली आणि तिच्या पोटातील बाळाचा काही भाग बाहेर आला आणि काही भाग आतमध्ये राहिला.




