वीस मिनटात ठोकल्या तोतया पोलीसाला बेड्या
तिवसा पोलीसांची कारवाई

-नोकरीच्या नावाखाली फसवणुकीचा प्रयत्न
तिवसा / 26 जून: पोलीस विभागात नोकरी लावून देतो, मी पोलीस आहे, अशी बतावणी करून दोन लाख रुपयांनी फसवणूक करणार्या तोतया पोलीसाला बुधवारी तिवसा पोलीसांनी रोख रक्कम व कागदपत्रासह वीस मिनिटात अटक केली. विनायक काशिनाथ बोरकर (60, रा. मोरोडा. ता. मुल, जिल्हा चंद्रपूर) असे अटक करण्यात आलेल्या तोतया पोलीसाचे नाव आहे. फिर्यादी संकल्प संजय राणे (19, रा. महेगाव ता. तुमसर, जिल्हा भंडारा) यांच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध तिवसा पोलीसांनी 318(4)319(2)204 बीएनएस या कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
आरोपी विनायक काशिनाथ बोरकर हा गेल्या काही दिवसापासून संकल्प याचे नातेवाईक तीर्थराज चव्हाण यांच्या सातत्याने संपर्कात होता. या दरम्यान 25 रोजी फोनवरून आरोपीने पैसे व मुलाचे कागदपत्रे घेऊन मोझरी येण्यासं सांगितले. तेव्हा आपल्या सफारी या चारचाकी वाहनाने तुमसर वरून दुपारी 3 वाजता मोझरी पोहचले. यावेळी आरोपीने त्यांच्या जवळून दोन लाख रुपये व संकल्प याचे सर्व शैक्षणिक कागदपत्रे घेतले आणि वाहनातून उतरून अमरावतीच्या दिशेने पळ काढला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ तिवसा पोलीस स्टेशनं गाठले. सर्व हकीकत पोलीसांना सांगितली.
यावेळी तिवसा पोलीसांनी तपासाचे चक्र फिरवत अवघ्या वीस मिनिटात आरोपीचा शोध लावला आणि त्याला बेड्या ठोकल्या. यावेळी आरोपीकडून दोन लाख रुपये रोख व कागदपत्रे जप्त करत न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई तिवसा पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनात एपीआय अमोल मुडे, पीएसआय उमेश पिसळकर,अरविंद गावंडे, सागर क्षीरसागर, चालक मोईन यांनी केली. पुढील तपास तिवसा पोलीस करित आहे.




