अचलपूरमध्ये न्यायाधीशांच्या घरी 25 लाखांची चोरी

7 तोळे सोने, 20 तोळे चांदी आणि रोख रक्कम लंपास

अचलपूरच्या सिव्हिल लाईन्समध्ये सोमवारी रात्री मोठा डल्ला

सीसीटीव्ही बंद असल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान

परतवाडा/18 ऑगस्ट– शहरातल्या अतिशय महत्त्वाच्या सिव्हिल लाईन्स भागात राहणारे न्यायाधीश मो. सादिक यांच्या बंद बंगल्याचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 25 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. यात 23 लाख 56 हजार रुपयांचे 17 तोळे सोने, 48 हजार रुपयांची 20 तोळे चांदी आणि 1 लाख 90 हजार रुपयांची रोख रक्कम असा मोठा ऐवज चोरीला गेला आहे. या घटनेमुळे अचलपूर आणि परतवाडा या जुळ्या शहरात एकच खळबळ उडाली आहे.
मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता बंगल्याचे केअरटेकर मो. इनाम मो. उमर पाहणीसाठी गेले असता, त्यांना मुख्य दाराचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी लगेच नागपुरात असलेल्या मो. सादिक यांना फोनवरून माहिती दिली. शहरात न्यायाधीशांच्या बंगल्यात चोरी झाल्याची बातमी वार्‍यासारखी पसरताच एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलीस पथक, फॉरेन्सिक टीम अन् श्वान पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दिवसभर बंगल्याची आणि परिसराची बारकाईने तपासणी केली. तपासात बंगल्यातील सर्वसीसीटीव्ही बंद असल्याचे समोर आले. मात्र परिसरातील इतर कॅमेर्‍यांच्या फुटेजवरून दोन सायकलींवरून आलेले पाच चोरटे यात सामील असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहेत. मो. सादिक हे परतवाडा शहराचे मूळ रहिवासी असून नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयात कार्यरत होते. सेवानिवृत्तीनंतर सेवाविस्तार मिळून ते न्याय विभागातच काम करत आहेत. व्हीआयपी भागातच ही चोरी झाल्याने नागरिकांमध्ये कमालीची भीती पसरली असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
काही महिन्यांपूर्वी अमरावती शहरातील न्यायालय वसाहतीमधील 5 घरे चोरट्यांनी अशाच प्रकारे फोडली होती. त्या प्रकरणात शहर पोलिसांनी सर्व आरोपींना तात्काळ जेरबंद केले होते. त्याच धर्तीवर या अचलपूरमधील 25 लाखांच्या मोठ्या चोरीचा छडा लावण्याचे अन् सर्व आरोपींना लवकरात लवकर पकडण्याचे कठीण आव्हान आता पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button