नागपूरच्या दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025 ची घोषणा

नवी दिल्ली/18 ऑगस्ट :भारत सरकारने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025 ची घोषणा केली आहे. अर्जुन पुरस्कारासाठी सतरा खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. थलेटिक्स, बॅडमिंटन, हॉकी, बुद्धिबळ, नेमबाजी आणि कबड्डी यांसारख्या विविध खेळांमधील खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. क्रीडा मंत्रालयाने निवड समितीच्या शिफारशींच्या आधारे या पुरस्कारांची घोषणा केली. अर्जुन पुरस्कार 2025 साठी एकूण 17 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
बुद्धिबळात विदित संतोष गुजराती आणि नागपूरच्या दिव्या जितेंद्र देशमुख यांना हा सन्मान मिळेल. कर्णबधिर नेमबाजीमध्ये धनुष श्रीकांत यांचाही समावेश आहे. हॉकीमध्ये लालरेम्सियामी आणि राजकुमार पाल यांना अर्जुन पुरस्कार मिळेल. कबड्डीमध्ये सुरजीत आणि पूजा यांची निवड झाली आहे. पॅरा-शूटिंगमध्ये रुद्रांश खंडेलवाल,पॅरा-थलेटिक्समध्ये एकता भ्यान, रोइंगमध्ये अरविंद सिंग आणि नेमबाजीमध्ये अखिल शेओरन यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले जाईल.राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025 ची यादी जाहीर करताना, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने सांगितले की, हे पुरस्कार दरवर्षी क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्या खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थांना प्रदान केले जातात. यावर्षी, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश (निवृत्त) न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने पुरस्कारांसाठी नामांकनांची शिफारस केली.
थलेटिक्समध्ये तेजस्विन शंकर, मोहम्मद अजमल व्ही आणि प्रियांका गोस्वामी यांना हा सन्मान मिळेल. बॅडमिंटनमध्ये ट्रीसा जॉली आणि महान प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांची कन्या गायत्री गोपीचंद यांची निवड झाली आहे. नरेंद्र यांना बॉक्सिंगमध्ये अर्जुन पुरस्कार मिळेल.




