मी महाराष्ट्रातच राहणार, मोदींनी मला जबाबदारी दिलीय

पीएम भेटीनंतर सीएम फडणवीसांचा खुलासा

नवी दिल्ली /17 ऑगस्ट – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मुख्यमंत्री फडणवीसांच्या या दिल्ली दौर्‍यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले. परंतु या सर्व चर्चा फेटाळत देवेंद्र फडणवीस यांनी मी महाराष्ट्रातच राहणार असल्याचा खुलासा केला आहे.
राजकीय चर्चांवर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी दिल्लीत असलो किंवा मुंबईत असलो तरी चर्चा होते. अनेक रिकामटेकडे लोक आहेत, ज्यांना माझ्याबद्दल चर्चा करायला आनंद वाटतो. त्यांना आनंद घेऊ द्या. ज्याला जे तारे तोडायचे आहेत, जे फुगे उडवायचे आहेत, जी पंतग उडवायची आहे ती त्यांना उडवू द्या. मी महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील जनतेने आणि माझे नेते नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे दिली आहे. मी प्रामाणिकपणे महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करतोय आणि ती करत राहणार आहे. अनेक लोकांना वाटते मी दिल्लीत गेलं पाहिजे परंतु मी मुंबईतच आहे असं सांगत फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावला. राज्यातील विविध प्रश्नांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. प्रशासन आणि प्रकल्प याबाबत माहिती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना दिली. केंद्र सरकारसोबत सुरू असलेल्या प्रकल्पाचा आढावा पंतप्रधानांना देण्यात आला. केंद्र सरकारकडून लागणार्‍या मदतीचे पत्र मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना दिले. मेट्रो, उत्तन विरार कॉरिडोर प्रकल्प यासारख्या विविध प्रकल्पांची माहिती फडणवीसांनी पंतप्रधान मोदींना दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. उत्तन विरार कॉरिडोर प्रकल्पासाठी केंद्राला प्रस्ताव दिला आहे. याविषयी त्यांच्याशी चर्चा करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

Back to top button