धारणीत वादळाचा महावितरणला मोठा फटका
वीज वाहिन्या तुटल्या, खांब पडले

-दुरूस्ती कार्य वेगाने सुरु
अमरावती / 18 मे: आज रविवारी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान धारणी परिसरात वादळासह झालेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका महावितरणला बसला आहे. वादळाचा तडाखा एवढा प्रचंड होता की, अनेक ठिकाणी झाडे उन्मळून महावितरणच्या वीज वाहिन्या, वीज खांबावर पडलीत. त्यामुळे महावितरणचे खांब व वाहिन्या अनेक ठिकाणी क्षतीग्रस्त व जमिनदोस्त झाल्या आहेत. वादळाचा जोर कमी होताच महावितरणने दुरूस्तीच्या कार्याला सुरूवात केली आहे. तथापि रात्रीमुळे अंधार आणि जंगलाचा भाग असल्याने दुरूस्ती कार्यात अडथळे येत आहेत.
धारणी परिसराला वीज वाहिन्यांचा बहुतांशी प्रवास हा जंगलातून आहे. त्यामुळे वादळाचा मोठा फटका महावितरणला बसला आहे. वादळामुळे अचलपूर व धारणी परिसरातील 6 फिडर बाधित झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने 11 केव्ही हरिसाल मिश्र, 11 केव्ही दुनी, 11 केव्ही पाटीया, 11 केव्ही धारणी, 11 केव्ही कुटांगा, 11 केव्ही ढाकरमल आणि 11 केव्ही दिया या मिश्र फिडरचा समावेश आहे. 11 केव्हीचे सहा आणि अंतर्गत वाहिन्या क्षतीग्रस्त झाल्याचा फटका परिसरातील अनेक गावांना बसला आहे.
मुख्य अभियंता अशोक साळुंके या सर्व गोष्टीवर लक्ष ठेवून असून अधीक्षक अभियंता दिपक देवहाते आणि कार्यकारी अभियंता संजय कुटे यांच्या पुढाकाराने लगेच कामाला सुरूवात करण्यात आली आहे. वीज ग्राहकांनी या काळात सहकार्य करण्याचे आवाहन अधीक्षक अभियंता दिपक देवहाते यांनी केले आहे.