खामेनेई यांची प्रकृती चिंताजनक, रुग्णालयात दाखल
शहीद झाल्याची बातमी आल्यास आश्चर्य वाटणार नाही, इस्रायली सूत्रांचा दावा

नवी दिल्ली /7 ऑगस्ट ; सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे वृत्त आहे. हा दावा इस्रायली प्रसारमाध्यम चॅनेल 14 ने, इराणमधील अंतर्गत सूत्रांच्या हवाल्याने केला आहे. महत्वाचे म्हणजे, तेहरानमधील सत्ताधार्यांच्या वरिष्ठ वर्तुळात, त्यांच्या (खामेनेई) गंभीर स्थितीसंदर्भात उलटसुलट चर्चा सुरू असल्याचे म्हणण्यात आले आहे. दरम्यान, लवकरच ते शहीद झाल्याची बातमी मिळाल्यास, आम्हाला आश्चर्य वाटणार नाही, असे जेरुसलेम पोस्टच्या एका सूत्राने म्हटले आहे.
अमेरिका आणि इस्रायलने 28 फेब्रुवारीला केलेल्या लष्करी हल्ल्यात मोजतबा खामेनेई यांचे वडील तथा सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई ठार झाल्यानंतर मोजतबा यांनी 28 फेब्रुवारी रोजी इराणची सूत्रे हाती घेतली आहेत. मात्र ते अद्यापही जगासमोर आलेले नाहीत. ते केवळ लेखी विधानांद्वारे संवाद साधत आहेत. पहिल्या हल्ल्यातच तेही गंभीर जखमी झाल्याचे बोलले जाते. त्यांच्या चेहर्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाल्याने ते भूमिगत असावेत, असे मानले जाते.
दरम्यान, इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान यांनी सरकारी टीव्हीला दिलेल्या मुलाखती मान्य केले आहे, की सध्या खामेनेई यांच्याशी थेट संवाद साधणे कठीण आहे. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत दावा केला होता की, इराणचे सर्वोच्च लष्करी नेतृत्व संपवण्यात आले आहे. लष्करी कारवाईत खामेनेइ 90% संपलेले होते आणि काम करण्याच्या स्थितीत नव्हते. महत्वाचे म्हणजे, इराणच्या आरोग्य मंत्रालयाने त्यांच्या दुखापती अधिक नसल्याचा आणि परिस्थिती नियंत्रणात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मोजतबा खामेनेई अद्यापही कुठल्याही प्रकारे समोर न आल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.




