राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचा समारोप

पाच दिवसीय स्पर्धेत 703 खेळाडूंचा सहभाग

विजयी खेळाडूंना ठाणे स्पर्धेत संधी

अमरावती /6 ऑगस्ट- सिटी अँड डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसि एशनच्यावतीने आयोजित ’योनेक्स सनराइज जी. एच. रायसोनी मेमोरिअल दुसरी महाराष्ट्र राज्य सब-ज्युनिअर (अंडर-9, अंडर-11, अंडर-13) निवड बॅडमिंटन स्पर्धा-2026’चे भव्य उद्घाटन 5 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता अमरावती येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे पार पडले.
या कार्यक्रमाला अमरावती मतदारसंघाच्या आमदार सुलभा खोडके, अमरावतीच्या विभागीय आयुक्त नयना गुंडे, क्रीडा व युवक सेवा विभागाचे उपसंचालक अविनाश पुंड, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव सिद्धार्थ पाटील आणि रायसोनी एज्युकेशनल ग्रुपचे जनसंपर्क संचालक अमित गंधारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या राज्यस्तरीय स्पर्धेत संपूर्ण राज्यातून सुमारे 703 उदयोन्मुख बाल खेळाडू सहभागी झाले आहेत. 9 ते 13 वर्षे वयोगटातील या खेळाडूंना 9 ऑगस्टपर्यंत आपले क्रीडा कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेद्वारे महाराष्ट्र बॅडमिंटन संघासाठी सर्वोत्कृष्ट खेळाडूंची निवड केली जाणार असल्याने या स्पर्धेला विशेष महत्त्व आहे. या स्पर्धेनंतर ठाणे येथे चॅम्पियनशिप स्पर्धा होईल, ज्यातील विजेत्यांची अंतिम राज्य संघात निवड होईल, अशी माहिती असोसिएशनचे उपाध्यक्ष सुनील गद्रे यांनी दिली. उद्घाटनप्रसंगी आमदार सुलभा खोडके व आयुक्त नयना गुंडे यांनी स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन केले. त्यानंतर कोर्ट 1 वर अकोला विरुद्ध नांदेड आणि कोर्ट 2 वर पुणे विरुद्ध मुंबई असे सलामीचे सामने रंगले. मान्यवरांनी खेळाडूंना शिस्त आणि क्रीडा भावनेने खेळण्याचे आवाहन केले. उद्घाटन सोहळ्यानंतर आमदार सुलभा खोडके व विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी स्वतः कोर्टवर उतरून बॅडमिंटन खेळण्याचा आनंद घेतला. दोन्ही मान्यवर महिलांनी सुरेख फटके मारत उपस्थितांची दाद मिळवली.5 ऑगस्ट रोजी सुरू झालेल्या या पाच दिवसीय स्पर्धेचा शानदार सांगता सोहळा 9 ऑगस्ट रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे होणार आहे. या स्पर्धेत एकेरी, दुहेरी व मिश्र दुहेरीचे सामने रंगणार आहेत. कार्यक्रमाच्या यशासाठी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अनिल धामोरीकर, सचिव संजय चौधरी, उपाध्यक्ष सुनील गद्रे, अंबर मोहोड, रोहित गद्रे, संजय धोटे व रोहित राठी विशेष परिश्रम घेत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button