कठोरा चौकातील उपहारगृहात तुफान हाणामारी

शाल उपहारगृहात मद्यधुंद मित्रांमध्ये राडा

गाडगे नगर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

अमरावती /22 जुलै- शहरानजीकच्या गाडगे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या कठोरा चौक परिसरातील शाल उपहारगृहात दारू पिण्यावरून दोन जुन्या मित्रांमध्ये जुन्या वैमनस्यातून जोरदार भांडण झाले. या वादाचे रूपांतर थेट रक्तरंजित हाणामारीत होऊन एका मित्राने दुसर्‍यावर प्राणघातक हल्ला चढवला. या भयंकर घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कठोरा चौकातील शाल उपहारगृहात सुरेश वासनिक आणि किरण रेवणे हे दोघे एकत्र बसून दारू पीत होते. दारूचा अंमल चढताच त्यांच्यात जुन्या भांडणावर ताणतणाव वाढला आणि शाब्दिक चकमक उडाली. हा वाद इतका ताणला गेला की एकमेकाला मारहाण करत असतांना नशेत असलेल्या किरण रेवणे याने जुना राग मनात धरून सुरेश वासनिक यांच्यावर थेट जीवघेणा हल्ला चढवला. या हल्ल्यात वासनिक यांच्या तोंडाला अन् शरीरावर गंभीर दुखापती झाल्या नेते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. आरडाओरड ऐकून परिसरातील लोकांनी मध्यस्थी करत रक्ताने माखलेल्या जखमी सुरेश वासनिक यांना तातडीने रुग्णालयात पोहोचवले. घटनेची माहिती मिळताच गाडगे नगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार गोरखनाथ जाधव, पीएसआय योगेश श्रीवास, डीबी पथकाचे राजेश बुरेले, सुशांत प्रधान आणि मतीन शहा यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी किरण रेवणे याला ताब्यात घेतले. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे. गाडगे नगर पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून सखोल तपास सुरू आहे.

संबंधित बातम्या

Back to top button