वलगाव दुहेरी हत्याकांडात पाच आरोपी गजाआड
भातकुली बसस्थानकावरून आवळल्या मुसक्या

गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाची थरारक कारवाई
अमरावती/20 जुलै – वलगाव येथील जुन्या बसस्थानकाजवळ पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांवर चाकूने सपासप वार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या खळबळजनक दुहेरी हत्याकांडातील पाच मुख्य आरोपींना अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने भातकुली बसस्थानक परिसरातून पळून जाण्याच्या तयारीत असताना अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले. विक्की ऊर्फ गोलू विकास उगले वय 21 मिलन गोपाळराव तायडे वय 21 अजय दिलीपराव नागदिवे वय 21 अनिकेत विलास मेश्राम वय 25 आणि सुमित सुधाकर सुरजुसे वय 19 सर्व राहणार वलगाव अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. वलगाव पोलिसांनी याप्रकरणी 316/2026 गुन्हा दाखल केला असून सर्व मारेकर्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.या थरारक घटनेची पोर्शभूमी अशी की वलगाव येथील रामलता नगर भागात राहणार्या 60 वर्षांच्या लीलाबाई अनिल तसरे यांचा 19 वर्षांचा नातू संजोग विकास जोशी आणि त्याचा मित्र ऋतिक पंडित हे घरामध्ये असताना गोलू उगले मिलिंद तायडे सुमित सुरजुसे आणि अजय नागदिवे तिथे आले. ते संजोग व ऋतिकला सोबत घेऊन गेले. त्यानंतर रात्री 11:30 च्या
सुमारास शेजारी राहणार्या इंदुबाई पंडित आणि सुनिताबाई पंडित यांनी संजोग व ऋतिकवर चाकूने हल्ला झाल्याची माहिती दिली. त्यांना गंभीर अवस्थेत उपचारासाठी इर्विन रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि संजोगचा मित्र आदेश बाळू उगले याने पोलिसांना सांगितले की तो वलगाव येथील जुन्या बसस्थानकाजवळील पानटपरीजवळ गेला असताना बिकानेर दुकानाच्या बाजूला आरडाओरड ऐकू आली. तिथे गोलू उगले हा संजोगवर आणि मिलन तायडे हा ऋतिकवर चाकूने वार करत होते. तर सुमित सुरजुसे आणि अजय नागदिवे यांनीही त्यांच्यावर चाकूने हल्ला चढवला. काही दिवसांपूर्वी सुधीर पांडुरंग उगले व चंदू जानरावजी उगले यांच्यासोबत संजोग आणि ऋतिकचा वाद झाला होता. याच जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी या पाच जणांनी मिळून दोघांचा जीव घेतला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश दहातौंडे आणि पोलीस निरीक्षक अतुल वर यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे तात्काळ चक्र फिरवली. भातकुली बसस्थानकावरून हे आरोपी पळून जाण्याच्या बेतात असताना पोलिसांनी त्यांना वेढा घालून पकडले. या प्रकरणाचा पुढील तपास वलगाव पोलीस करत आहेत.




