जागेच्या वादातून कुर्हाड व विळ्याने हल्ला
आरोपी बाप-लेकावर गुन्हा

अचलपूर / 24 जून: 25 वर्षांपूर्वीच्या जागेच्या व्यवहारातून उद्भवलेल्या भांडणात बाप-लेकाने शेजारी राहणार्या इसमावर कुर्हाड आणि विळ्याने प्राणघातक हल्ला करुन त्यांना गंभीररीत्या जखमी केल्याची घटना पथ्रोट पोलिस ठाण्याच्या हद्दीत रासेगाव येथे घडली. राजू जानराव भागवतकर (57) असे जखमी इसमाचे नाव आहे. आरोपी विश्वनाथ शेषराव रामेकर (60) आणि योगेश विश्वनाथ रामेकर (23) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार आरोपी आणि फिर्यादी हे रासेगाव येथील रहिवासी आहे. राजू भागवतकर यांनी विश्वनाथ रामेकर यांच्याकडून 25 वर्षांपूर्वी गावातील एक प्लॉट 50 हजार रुपये देउन विकत घेतला होता. मात्र अजूनही लेखी स्वरुपात रामेकर यांनी हा प्लॉट भागवतकर यांच्या नावे केलेला नाही. त्यासाठी भागवतकर हे मागे लागले असता रामेकर यांनी टाळाटाळ चालविली होती. त्यामुळे भागवतकर यांनी रामेकर यांच्याविरोधात कोर्टात केस टाकली आहे. त्यानंतर भागवतकर यांनी या प्लॉटला तारेचे कुंपनही घातले.
त्यावरुन रामेकर पिता-पुत्राने हे कुंपन तोडून टाकले आणि त्यावरून भागवतकर यांच्याशी भांडण केले. त्यातच विश्वनाथ रामेकर याने कुर्हाडीने तर त्याचा मुलगा योगेशने विळ्याने राजु भागवतकर यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविला. त्यात भागवतकर यांच्या हात, छाती आणि डोक्याला जबर दुखापत होवून ते गंभीररीत्या जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले. भागवतकर यांच्या तक्रारीवरुन पथ्रोट पोलिसांनी आरोपी रामेकर बाप-लेकावर गुन्हा दाखल केला आहे.




